Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

रमजान महिन्यातील शुक्रवारचे महत्त्व

रमजान महिन्यातील शुक्रवारचे महत्त्व
, शनिवार, 2 एप्रिल 2022 (15:16 IST)
आजचा शुक्रवार हा या रमजान महिन्यातील शेवटचा शुक्रवार (जुमा) आहे. याला जुमातुल विदाअ म्हणतात. रमजान महिन्यातील शुक्रवाराला अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. रोजेधारकांसाठी हा वार कृपेची, पुण्याची अनुपम् भेट घेऊन येतो. म्हणून मुस्लीमबांधव शुक्रवारची मोठ्या आतुरतेने प्रतीक्षा करीत असतात. अन्य दिवसांप्राणेच शुक्रवारी देखील सर्व दिनक्रम पार पाडायचे असतातच परंतु दुपारी दीड वाजता होणारी नमाज ज्याला ‘जुम्माची नमाज' संबोधण्यात येते. ती फार महत्त्वाची असते.
 
ही नमाज कोणीच चुकवत नाहीत. रोजेधारकांसाठीतर ही नमाज पुण्याचा मोठा तोफा असतो. शुक्रवारी सर्व मशिदी खचाखच भरलेल्या असतात. मशिदीच्या अवतीभोवती सुरमा लावणार्यांची अत्तर विकणार्यांची रेलचेल दिसून येते. वातावरण प्रसन्न आणि सुगंधी असते. अनेकजण निर्धारित वेळे अगोदरच संपूर्ण स्वच्छतेनिशी आपापल्या मोहल्ल्यातील मशिदीत दाखल होतात. कारण जुम्माची मुख्य नमाज सुरू होणपूर्वी इमाम किंवा धर्मगुरू यांचे प्रवचन होते. यातून सदाचरण, अल्लाहवरील श्रद्धा (इमान) एकनिष्ठता आणि इस्लामधर्माने आपल्या अनुयायांना सन्मार्गावर चालण्यासाठी सांगितलेल्या तत्वांच्या अनुषंगाने मार्गदर्शन करण्यात येते. 
 
त्यानंतर सामुदायिकरीत्या नमाज अदा करण्यात येते. बंद्यांच्या हातून कळत नकळत घडलेल्या चुकांची क्षमा मागत, सर्वांच्या कल्याणासाठी दुवा मागितली जाते. ही दुवा असरदार असते. दुवा संपताच धर्मगुरूशी हस्तांदोलने करून लोक मशिदी बाहेर पडतात. त्या ठिकाणी जमलेल्या गोरगरीब निराधारांना ऐपतीनुसार दानधर्म (खैरात) करतात. या महिन्यातील शेवटच्या शुक्रवारला ‘जुमअ-तुल-विदा' असे म्हणतात. रमजान महिन्यातील प्रत्येक शुक्रवारचे वैशिष्ट्‌य असे की या दिवशी केलेली सत्कर्मे अन्यदिवशी केलेल्या सत्कर्मांपेक्षा कितीतरी पटींने अधिक पुण्यण्दायी फलदायी ठरतात. ‘माणसाला अल्लाहच्या उपासनेकरिता निर्माण केले गेले आहे. बंद्यांनी केलेल्या उपासनेवर आनंदित होऊन अल्लाह त्यांना सर्वोच्च मोबदला प्रधान करतो' असे हजरत मोहम्मद पैगंबरांचे शुभवचन आहे. याचा पुरेपूर अंगीकार करून रोजेधारक दुराचारापासून, असत्तेपासून स्वतःला दूर ठेवून इमानदारीपूर्वक इबादत करण्यात कोणतीही कसर सोडत नाही. शुक्रवार तर त्यांच्यासाठी लाख मोलाचा असतो. सध्या कोरोना विषाणूचा फैलाव वाढत आहे. तेव्हा नमाज कोणतीही असो कुणीही मशिदीत जाऊ नये. आपापल्या घरातच नमाज अदा करावी.
 
बदीऊज्जमर बिराजदार
(साबिर सोलापुरी)

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

भगवान सत्यनारायणाची कथा का केली जाते? जाणून घ्या महत्त्व