केंद्र सरकारने आकाशवाणी पुणे केंद्राचा प्रादेशिक वृत्त विभाग बंद करण्याचा आदेश दिला आहे. प्रादेशिक वृत्त विभागातील उपसंचालक आणि वृत्त संपादक ही दोन्ही पदे अनुक्रमे श्रीनगर व कोलकात्याला हलवण्यात येणार आहेत.
टीव्ही चॅनेल, सोशल मीडिया आणि मोबाईलच्या जगात दिवसभर बातम्यांचा भडिमार सुरू असतो. तरीही महाराष्ट्रातील कोट्यवधी नागरिक सकाळी ७.१०च्या बातम्या आवर्जून ऐकत होते. नागरिकांना जगातील घडामोडींची माहिती देणारे १० मिनिटांचे बातमीपत्र अनेकांच्या दैनंदिन जीवनाचाच एक भाग झाले होते. 'नमस्कार, आकाशवाणीचे हे पुणे केंद्र आहे' सकाळचे सात वाजून दहा मिनिटे झाली आहेत...कोट्यवधी नागरिकांपर्यंत पोहोचणारा हा आवाज आता लवकरच बंद होणार आहे.