पुण्यातील काँग्रेस भवनमध्ये मोफत छत्री दुरुस्ती उपक्रमाचा बॅनर लागला.राज्यभरात काँग्रेसच्या या उपक्रमाची खिल्ली उडवण्यात आली. परंतु सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटोमुळे काँग्रेसची वाह…वाह व्हायला लागली आहे. याचे कारणही तेवढेच गमतीदार आणि खिल्ली उडवणाऱ्यांना चपराक देणारं आहे. झाले ते म्हणजे असं की, काँग्रेसच्या मोफत छत्री दुरुस्ती उपक्रमात पुण्यातील काँग्रेस भवनात चक्क भाजपची छत्री आली . या छत्रीवर भाजप नेते गिरीश बापट यांचं नाव आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी फोटो शेअर करत या उपक्रमाचे खिल्ली उडवणाऱ्या भाजप नेत्यांवर निशाणा साधला आहे.
पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी तर्फे पुण्यातील काँग्रेस भवन येथे मोफत छत्री दुरुस्ती उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. उपक्रमाचे आयोजक मोहन जोशी आहेत. सध्या याच ठिकाणी १४ ते १९ जूनपर्यंत हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमाचे बॅनर आणि जाहिरात पुणे शहरात करण्यात आल्यावर विरोधक आणि नेटकऱ्यांनी या उपक्रमाची खिल्ली उडवली होती. परंतु या उपक्रमाचा आतापर्यंत शेकडोहून अधिक नागरिकांनी लाभ घेतला आहे. शेकडो नागरिकांनी आपल्या नादुरुरुस्त आणि जून्या छत्र्या दुरुस्त करुन घेतल्या आहेत.
भाजपच्या नेत्यांकडून या उपक्रमावर खिल्ली उडवण्यात आली होती. भाजपचे विधानपरिषदेचे आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विट करत या उपक्रमाची खिल्ली उडवली होती. सध्या दोन चिल्लर पक्षांच्या छता खाली असलेला काँग्रेस पक्ष फुटकळ कामांची किती मोठी जाहिरातबाजी करतोय पाहा…या होर्डिंग च्या किमतीत ५० नव्या छत्र्या आल्या असत्या, असं ट्विट करुन भातखळकर यांनी करुन खिल्ली उडवली होती. परंतु काँग्रेसच्या या उपक्रमाअंतर्गत आतापर्यंत १०० हून अधिक नागरिकांनी आपल्या छत्र्या दुरुस्त करुन घेतल्या आहेत.
पुण्यातील काँग्रेस भवनमध्ये मोफत छत्री दुरुस्ती उपक्रम राबवण्यात येत आहे. यामुळे मोहन जोशी यांनी उपक्रमाला सुरुवात केली असून सध्या याच ठिकाणी हा उपक्रम राबवण्यात येत असून पुढील काही दिवसांत पुण्यातील एकूण ८ मतदारसंघात राबविण्यात येणार आहे.