Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कोरोना : घरगुती गणपतींसाठीचे 16 नियम

कोरोना : घरगुती गणपतींसाठीचे 16 नियम
, बुधवार, 8 सप्टेंबर 2021 (18:30 IST)
शुक्रवारी (10 सप्टेंबर) घरोघरी बाप्पांचं आगमन होईल. पण गेल्यावर्षी प्रमाणे यंदाही गणपती उत्सवावर कोरोनाचं सावट आहे.
 
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन गणेशोत्सव आणि अन्य सण साधेपणाने साजरे करावेत, असं आवाहन याआधीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.
 
सरकारने आता कोव्हिडकाळात गणपतीचं आगमन आणि विसर्जनासाठी नागरिकांनी कोणती खबरदारी घ्यायची आहे, यासंबंधीच्या सूचना प्रसिद्ध केल्या आहेत.
 
काय आहेत या मार्गदर्शक सूचना?
1. घरगुती गणेशमूर्तींचं आगमन मिरवणुकीच्या स्वरूपाचं नसावं. आगमनासाठी जास्तीत-जास्त 5 जणांचा समूह असावा. शक्‍यतोवर या व्यक्तींनी कोरोना लशीचे दोन डोस घेतलेले असावेत आणि दुसरा डोस घेवून 15 दिवस झालेले असावेत. घरगुती उत्‍सवासाठी गणपतीची मूर्ती 2 फुटांपेक्षा जास्त उंचीची नसावी.
 
2. घरगुती गणेशोत्सवासाठीची मूर्ती शक्यतो शाडूची असावी. शक्य असल्यास यावर्षी पारंपारिक शाडूच्या गणेशमूर्तीऐवजी घरात असलेल्या धातू/संगमरवर आदी मूर्तींचे पूजन करावे. जेणेकरुन, आगमन / विसर्जनासाठी गर्दीत जाणे टाळून स्वतःचे/कुटुंबियांचे कोव्हिड-19 पासून संरक्षण होईल.
 
3. घरगुती गणेशाची मूर्ती शाडूची किंवा पर्यावरणपूरक असल्यास त्याचं विसर्जन शक्यतोवर घरच्या घरी बादलीत किंवा ड्रममध्‍ये करावं.
 
4. गणेशमूर्तींचं विसर्जन घरच्या घरी करणे शक्य नसल्यास नजिकच्या कृत्रिम विसर्जन स्थळी मूर्तीचं विसर्जन करण्यात यावं. तसंच सार्वजनिक गणेशोत्‍सव मंडळांनी देखील नजीकच्‍या कृत्रिम विसर्जन स्थळी मूर्तीचं विसर्जन करण्‍यास प्राधान्‍य द्यावं.
 
5. घरगुती गणपतीच्या विसर्जनाच्या वेळी मिरवणुकीने जाऊ नये. विसर्जनासाठी जास्तीत जास्त 5 व्‍यक्‍ती असाव्‍यात. या व्यक्तिंनी कोरोना लशीचे 2 डोस घेतलेले असावेत आणि दुसरा डोस घेवून 15 दिवस झालेले असावेत.
 
6. घरगुती गणेशमूर्तीचं विसर्जन करताना, संपूर्ण चाळीतील/इमारतीतील सर्व घरगुती गणेशमूर्ती विसर्जनासाठी एकत्रितरित्या नेऊ नयेत.
 
7. विसर्जनाच्या पारंपारिक पद्धतीत विसर्जन स्थळी होणारी आरती घरीच करुन विसर्जन स्थळी कमीत-कमी वेळ थांबावं. विसर्जन प्रसंगी मास्‍क/शिल्‍ड इत्यादी स्‍वसंरक्षणाची साधने काटेकोररित्‍या वापरण्‍यात यावी.
 
8. लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने विसर्जन स्थळी जावू नये.
 
9. मुंबई शहरात एकूण 73 नैसर्गिक विसर्जन स्‍थळं आहेत. तिथे महापालिकेद्वारे अतिरिक्‍त मनुष्‍यबळ देवून मूर्ती संकलनाची शिस्‍तबद्ध व्‍यवस्‍था उपलब्‍ध करुन देण्‍यात आली आहे. त्‍यांच्याकडे गणेशमूर्ती देण्‍यात यावी. या नैसर्गिक विसर्जन स्‍थळांवर नागरिकांनी किंवा सार्वजनिक गणेशोत्‍सव मंडळांच्‍या कार्यकर्त्‍यांनी थेट पाण्‍यात जाऊन मूर्ती विसर्जन करण्‍यास प्रतिबंध आहे.
 
10. नैसर्गिक विसर्जन स्‍थळांवरील गर्दी कमी होण्‍यासाठी मुंबई महानगरपालिकेच्‍या 24 विभागांमध्‍ये सुमारे 173 ठिकाणी कृत्रिम तलाव देखील निर्माण करण्‍यात आले आहेत. कृत्रिम तलावालगत राहणाऱ्या भाविकांनी शक्‍यतोवर या कृत्रिम तलावाचा वापर करावा.
 
11. महापालिकेच्‍या काही विभागांतर्गत काही गणेशमूर्ती संकलन केंद्रं निर्माण करण्‍यात आली आहेत. मूर्ती संकलन केंद्रावर, कृत्रिम तलावांवर किंवा नैसर्गिक विसर्जन स्‍थळांवर उपलब्‍ध महापालिकेच्‍या व्‍यवस्‍थापनाकडे मूर्ती सूपूर्द करण्‍यापूर्वी मूर्तीची यथासांग पूजा आणि आरती घरीच किंवा मंडळाच्‍या मंडपातच करुन घेणे बंधनकारक आहे.
 
12. विसर्जनादरम्‍यान सोशल डिस्टन्सिंग, मास्‍क, सॅनिटायझर वापरणे यांसारख्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे.
 
13. सील केलेल्या इमारतींमधील गणेशमूर्तीच्‍या विसर्जनासाठी घरीच व्‍यवस्‍था करावयाची आहे.
 
14. घर/इमारत गणेशोत्सव कालावधीत प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केल्यास प्रतिबंधित क्षेत्र नियमांचे पालन करण्यात यावे.
 
15. मुंबई महानगरपालिका आणि पोलीस प्रशासन यांनी घालून दिलेल्‍या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्‍यात यावे.
 
16. उत्सव प्रसंगी अशी कोणतीही कृती करु नये, जेणेकरुन कोरोना विषाणूचा फैलाव होईल. अन्यथा अशी व्यक्ती साथरोग कायदा 1897, राष्ट्रीय आपत्ती निवारण कायदा 2005 आणि भादवि 1860 कायद्यान्वये कारवाईस पात्र ठरेल.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

धक्कादायक घटना : तळ्यात एकाच कुटुंबातील 3 मृतदेह आढळले