जंगली प्राण्यांच्या संघर्षाचे व्हिडीओ आपण अनेकदा सोशल मीडियावर बघितले असतील. मात्र सध्या सोशल मीडियावर एका वेगळ्याच व्हिडीओची चर्चा सुरु आहे. हा व्हिडीओ महाराष्ट्रातील जालना जिल्ह्यामधील अंबड तालुक्यातील असून यात दावणीला बांधलेल्या बैलासमोर नाग फणा काढून उभा असल्याचं दिसत आहे. हा प्रकार तब्बल 20 मिनिटं सुरु होता ज्यात नाग फणा काढून बैलासमोर उभा होता.
नाग बैला घाबरवण्याचा प्रयत्न करत असताना हा व्हिडिओ कॅमेरात कैद केला गेला आहे. ज्यात दिसून येत आहे की दावणीला बांधलेला हा बैल नागाला जराही घाबरला नाही. फणा काढून डोलत असलेल्या नागाचा जराही परिणाम बैलावर झाला नाही.
जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील लोणार भायगाव येथे ही घटना घडली असून आता याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. शेतकरी सोनाजी जाधव यांच्या शेतातील बखारीसमोर असलेल्या लिंबाच्या झाडाखाली बैलाला बांधण्यात आलं होतं जेथे बैलासमोर अचानक पाच फूट लांबीचा नाग आला. हा नाग बैलासमोर येऊन फणा काढून उभा होता. त्याने अनेकदा बैलाला घाबरवण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येत आहे पण बैलाला जराही फरक पडला नाही. ही बातमी वेगाने गावभर पसरली आणि हे दृश्य बघण्यासाठी गर्दी जमा झाली.
बैलाला इजा होऊ नये म्हणून शेतकऱ्याचे कुटुंबीय आणि गावकरी प्रार्थना करत होते कारण नागाने फणा काढल्यामुळे तो बैलावर हल्ला करेल असे वाटत होते. मात्र बैलाला काहीही इजा न करता नाग निघून गेल्याने नागरिकांना देखील आश्चर्य वाटले. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.