जिल्हा परिषद येथील लघु पाटबंधारे विभागातील अधिकाऱ्यांच्या स्टेट बँकेच्या खात्यातून सुमारे २२ लाख २१ हजार पाचशे रुपयांची ठेकेदाराची अनामत रक्कम गायब करण्यात आली आहे. याबाबत तत्कालीन रोखपालाविरुद्ध भद्रकाली पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, जिल्हा परिषदेचे सहाय्यक जिल्हा जलसंधारण अधिकारी रघुनाथ विठ्ठल गवळी (५०, रा. म्हसरूळ)यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बँक खात्यातील २२ लाख २१ हजार ५०० रुपयांच्या रकमेचा अपहार करण्यात आला आहे. याप्रकरणी संशयित तत्कालीन रोखपाल कनिष्ठ सहाय्यक लिपिक रवींद्र बाबुलाल ठाकरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित ठाकरे हे २६ डिसेंबर २०१८ साली रोखपाल पदावर कार्यरत होते.
दरम्यान त्यांनी या कालावधीत लघु पाटबंधारे विभागातील आहार व वितरण अधिकारी यांच्या स्टेट बँकेच्या खात्यातील एकूण रकमेपैकी ठेकेदाराच्या अनंत रामेकच्या अपहार करत शासनाची व त्यांची फसवणूक केल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी सहाय्यक निरीक्षक एस.बी अहिरे हे पुढील तपास करीत आहेत.