डोंबिवली जवळील 27 गावातील भोपर देसलेपाडा येथील एकाच कुटुंबातील पाच जणांचा शनिवारी संध्याकाळी खदानीत बुडून मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन महिला आणि तीन मुलांचा समावेश आहे. या घटनेने या भागात हळहळ व्यक्त केली जात आहे. गावातील पाणी टंचाईचे हे बळी असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे.
मीराबाई सुरेश गायकवाड (55), अपेक्षा गौरव गायकवाड (28), मोक्ष मनीष गायकवाड (22), सिध्देश कैलास गायकवाड (12) आणि मयुरेश मनीष गायकवाड (8) ही मुले आई आणि आजी बरोबर संदप गावातील खदानीत कपडे धुण्यासाठी गेली होती.
खदानीतील खोल पाण्याचा अंदाज न आल्याने एका पाठोपाठ मुले खदानीत खोल पाण्यात बुडू लागली. मुले बचावासाठी धावा करू लागताच, खदानीच्या काठावरील आजी, आईने पाण्यात उड्या मारल्या. मुलांना वाचविताना त्यांना पोहता येत नसल्याने त्याही बुडाल्या आणि एका पाठोपाठ एकाच घरातील पाचही जण बुडाले.