नागपुर : येथील शांतीनगरमध्ये 73 लाखांच्या धाडसी चोरीने पोलिसांसमोर आव्हान निर्माण झाले होते. पोलिसांच्या या प्रकरणी तपास करून दोघांना अटक केली आहे. मात्र जे समोर आले ते धक्कादायकच होते. दरम्यान तक्रारकर्त्याचा मुलगा आणि दुकानातील नोकरच या चोरीचे आरोपी निघाले आहेत. चोरीची रक्कम घेऊन आरोपी सौदी अरेबियात पळून जाण्याच्या तयारीत असल्याचे तपासादरम्यान समोर आले आहे.
अधिक माहितीनुसार, जाफर जावेद थारा (वय 28, कश्यप ले-आऊट, महेशनगर) आणि वाजीद गफुर अली (वय 27, गांजा खेत चौक) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये जावेद अब्दुल रज्जाक थारा (वय 56, प्लॅट क्रमांक एच-3, महेशनगर, कश्यप कॉलनी) हे रविवारी (दि. ३०) कुटुंबासह कामठी येथे साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी गेले होते. दरम्यान, अज्ञात आरोपीने त्यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून बेडरुममधील कपाटात ठेवलेले इलेक्ट्रॉनिक लॉकर उघडून त्यामधील 500 रुपयांचे 26 बंडल असे 13 लाख रुपये आणि सोन्याचे दीड किलो वजनाचे दागिने किंमत 60 लाख रुपये असा एकूण 73 लाखांचा मुद्देमाल चोरुन नेला होता.
इलेक्ट्रॅनिक लॉकर उघडून चोरट्यांनी रक्कम, दागिने पळविल्यामुळे लॉकरचा कोड माहिती असणाऱ्यानेच ही चोरी केली असावी, अशी शंका गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना आली होती. त्यानुसार त्यांनी जावेद अब्दुल रज्जाक थारा यांच्या दुकानामधील कामगार आरोपी वाजीद गफुर अली यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्याने जाफरने पैशांची पिशवी आपणास दिल्याचे गुन्हे शाखेच्या पोलिसांना सांगितले आहे. आरोपीच्या सांगण्यावरून गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जाफर जावेद थारा यास अटक केली.
घटनेमधील तक्रारकर्ते जावेद अब्दुल रज्जाक थारा यांचा मुलगा जाफरचे कुटुंबीयांशी पटत नव्हते. ते एकाच घरात राहत होते. जाफरला शेअर मार्केट ट्रेडिंगचा नाद होता. यामधूनच जास्त पैसे कमावण्याच्या नादात त्याने आपल्याच घरामध्ये चोरी करण्याचे नियोजन आखले. कुटुंबिय कामठी येथे साखरपुड्याच्या कार्यक्रमात गेल्याची संधी साधून जाफरने, घरामधील कपाटातील इलेक्ट्रॉनिक लॉकर उघडून दागिने आणि 13 लाख रुपये असा 73 लाखांचा मुद्देमाल चोरी केला. या कामात त्याने दुकानात काम करणाऱ्या वाजीद गफुर अलीची मदत घेतली. हे पैसे घेऊन जाफर सौदी अरेबियात पळून जाणार होता, अशी माहिती मिळाली आहे.
Edited by: Ratnadeep Ranshoor