वाइन शॉपचे लायसन्स तसेच इतर कारणांसाठी मामा व इतरांना भाच्याने तब्बल 93 लाख 40 हजारांना गंडा घातला. ही घटना नोव्हेंबर 2018 ते जानेवारी 2021 या कालावधीत कृष्णानगर, चिंचवड येथे घडली.
कृष्णदेव बबन काशिद (रा. लोहगाव, ता. जत, जि. सांगली) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपी भाच्याचे नाव आहे. याबाबत त्याचा मामा दत्तात्रय नारायण साळुंखे (वय 46, रा. कृष्णानगर, चिंचवड) यांनी मंगळवारी (दि. 18) याबाबत चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी काशिद याने फिर्यादी मामा साळुंखे यांना विश्वासात घेत हॉटेल रेस्टॉरंट बार आणि वाइन शॉपचे परमीट काढून देण्याचे आश्वासन दिले. त्यासाठी फिर्यादी यांच्याकडून रोख व ऑनलाइनद्वारे 70 लाख सहा हजार 988 रुपये घेतले.
फिर्यादी यांनी त्याच्याकडे दिलेल्या पैशाचा तगादा लावला असता त्याने बॅंकेत पैसे जमा केल्याच्या बनावट पावत्या शिक्क्यासह सादर केल्या. फिर्यादी यांचा कारचा अपघात झाला आहे असे भासवून फिर्यादी मामा साळुंके यांच्या विरोधात गुन्हा दाखल न करण्यासाठी व कार सोडवून आणण्यासाठी चार लाख 33 हजार 750 रुपये घेतले.
तसेच मोहन शामराव शिंदे (रा. वाघोल, ता. कवठे महाकाळ, जि. सांगली) यांचे सर्व्हिसचे पैसे मिळवून देण्यासाठी व पेन्शन सुरू करण्यासाठी आणि त्यांचा मुलास कॉलेजमध्ये नोकरी लावण्यासाठी त्यांचा विश्वास संपादन करून त्यांच्याकडून 19 लाख रुपये घेतले. फिर्यादी साळुंखे व मोहन शिंदे या दोघांची आरोपी काशिद याने 93 लाख 40 हजार 738 रुपयांची फसवणूक केली. चिखली पोलीस तपास करीत आहेत.