Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

…त्यामुळेच पंतप्रधान मोदी महाराष्ट्रात न येता गुजरातला गेले असावेत; संजय राऊत यांची टीका

…त्यामुळेच पंतप्रधान मोदी महाराष्ट्रात न येता गुजरातला गेले असावेत; संजय राऊत यांची टीका
, बुधवार, 19 मे 2021 (16:20 IST)
तौते चक्रीवादळाने गुजरात महाराष्ट्रासह पाच राज्यांना जोरदार तडाखा दिला. गुजरातमध्ये अनेक गावांना फटका बसला आहे. चक्रीवादळ गुजरात आणि दीव किनारपट्टीला जाऊन धडकलं होतं. त्यामुळे प्रचंड नुकसान झालं असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातच्या दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या पाहणी दौऱ्यावरून शिवसेनेचे नेते तथा खासदार संजय राऊत यांनी टोला लगावला आहे. त्याचबरोबर “चंद्रकांत पाटील जगातील सर्व संसदेच्या जागा जिंकू शकतात,” असं म्हणत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावरही निशाणा साधला आहे.
 
यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरात पाहणी दौऱ्यावरुन उपहासात्मक टीका केली. “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अत्यंत सक्षम मुख्यमंत्री आहेत. ते कोणत्याही संकटाचा सामना करण्यास समर्थ आहेत, याची खात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पटली असेल आणि ज्याठिकाणी जास्त नुकसान झालं, पण कमजोर सरकार आहे. अशा ठिकाणी जाऊन लोकांना धीर देण्याचा प्रयत्न करत असतील, त्याकडे वेगळ्या नजरेनं पाहण्याची गरज आहे असं मला वाटतं नाही. त्यामुळेच मोदी महाराष्ट्रात न येता फक्त गुजरातच्या दौऱ्यावरच गेले असावेत,” असा चिमटा राऊत यांनी मोदींना काढला. 
 
“तौते चक्रीवादळामुळे गुजरात, गोवा आणि महाराष्ट्रात नुकसान झाले आहे. अशा संकटाच्यावेळी कोणावरही टीका करणे योग्य नाही. मात्र, गुजरात हे पंतप्रधान मोदी यांचे स्वत:चे राज्य आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदी हे फक्त गुजरातचा दौरा करत असावेत,” असंही राऊत म्हणाले.
 
‘देशात अगदी उद्या निवडणूक झाली, तरी मोदी सरकार ४०० जागा जिंकेल’, असं वक्तव्य भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं. या विधानाचा संजय राऊत यांनी समाचार घेतला. चंद्रकांत पाटील यांनी ज्योतिष सांगण्याचा नवा व्यवसाय उघडला आहे, याचं मला कौतुक वाटतं. त्यामुळे भाजपाला ४०० काय अगदी ५०० जागाही मिळू शकतात. एवढंच काय ते जगभरातील संसदेच्या सर्व जागा जिंकू शकतात. सध्या राजकीय भविष्य वर्तवण्यापेक्षा करोना काळात लोकांचं भविष्य घडवणे जास्त गरजेचे आहे”, असं म्हणत राऊत यांनी पाटलांना प्रत्युत्तर दिलं.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

‘त्या’ पत्रावरून रोहित पवारांचे फडणवीसांना सडेतोड उत्तर, म्हणाले…