Publish Date: Mon, 11 Dec 2023 (08:13 IST)
Updated Date: Mon, 11 Dec 2023 (08:15 IST)
नाशिकरोड - शौच्यास बसलेल्या शाळकरी मुलावर बिबट्याने हल्ला करुन जखमी केले असून बिटको रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु आहेत. त्याची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय अधिकारी यांनी सांगितले.
पिंपळगाव खांब येथील रहिवासी सोमनाथ चारसकर व आरती चारसकर या शेत मजुराचा मुलगा अभिषेक सोमनाथ चारसकर (वय 9) हा पिंपळगाव खांब येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत इयत्ता चौथी मध्ये शिकत आहे. आज दुपारी तीन ते चार वाजेच्या सुमारास दाढेगाव रोड, भैरवनाथ मंदिरा मागे शौच्यास बसलेला होता.
काही मुलं,नागरिक या भागात होते. नदी किनारावरून अचानक एका बिबट्याने अभिषेक वर हल्ला केला, मात्र त्याने घाबरून न जाता आपल्या जवळ असलेला पाण्याने भरलेला डब्बा बिबट्याच्या तोंडावर मारला आणि आरडाओरड केली. पाण्याच्या डब्बाचा फटका तोंडावर लागल्याने बिबट्याने पळ काढला. या हल्ल्यात अभिषेकच्या बसण्याच्या जागेवर जबर जखम झाली.
घटनेची माहिती मिळताच माजी नगरसेवक जगदीश पवार व ग्रामस्थ यांनी अभिषेकला बिटको रुग्णालयात दाखल केले असून त्यावर वैद्यकीय उपचार सुरु आहे. त्याची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय अधिकारी यांनी सांगितले.वन अधिकारी यांनी घाटनास्थळी पाहणी केली.