Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

विधानपरिषदेच्या शतक महोत्सवानिमित्त आजी-माजी सदस्यांचा स्नेहमेळावा आणि परिसंवाद

parisanwad
, शुक्रवार, 6 ऑक्टोबर 2023 (08:12 IST)
मुंबई, : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त विद्यमान आणि विधानपरिषदेच्या माजी सदस्यांसाठी परिसंवाद आणि स्नेहमेळावा लवकरच आयोजित करण्यात येणार आहे. महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली विधानपरिषदेतील गटनेते आणि सदस्यांची आज बैठक झाली. यावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री तसेच अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत या परिसंवाद आणि स्नेहमेळाव्याचे उद्घाटन सत्र व्हावे, असे निश्चित करण्यात आले.
 
या बैठकीत विधानपरिषद शतक महोत्सवानिमित्त प्रकाशित करावयाच्या संदर्भसमृद्ध ग्रंथांच्या कामाचा आढावा देखील घेण्यात आला. विधानपरिषद या दुसऱ्या सभागृहाचे महत्त्व आणि वैशिष्ट्य, गत १०० वर्षातील महत्वपूर्ण विधेयके, ठराव, विधानपरिषदेमध्ये लोकहिताच्या महत्वाच्या प्रश्नांवर, विषयांवर झालेल्या चर्चा, शंभर वर्षे शंभर भाषणे आणि छायाचित्रांचे संकलन असलेले कॉफी टेबल बुक अशी पाच प्रकाशने प्रस्तावित असून त्यात कोणकोणते महत्वाचे संदर्भ समाविष्ट करण्यात यावेत यावर उपस्थित मान्यवरांनी महत्वपूर्ण सूचना या बैठकीत केल्या.
 
प्रस्तावित प्रकाशने आणि परिसंवाद यासंदर्भात ज्येष्ठ विद्यमान आणि माजी सदस्य, ज्येष्ठ पत्रकार, राजकीय अभ्यासकांना काही सूचना करावयाच्या असल्यास त्यांनी लेखी स्वरूपात आपले मत विधानमंडळाकडे अवश्य कळवावे, असे आवाहन विधानपरिषद उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी केले आहे. हा परिसंवाद आणि स्नेहमेळावा सर्वांनी मिळून यशस्वी करावा आणि ज्येष्ठांचे सभागृह असा लौकिक प्राप्त झालेल्या विधानपरिषदेच्या शतक महोत्सव सुवर्णक्षणांचे साक्षीदार व्हावे, असे उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी म्हटले आहे.
 
याबैठकीस माजी मंत्री ॲड. अनिल परब, सदस्य कपिल पाटील, सत्यजित तांबे, विधानमंडळ सचिवालयाचे सचिव २ विलास आठवले, उपसभापती यांचे खासगी सचिव रवींद्र खेबुडकर, विशेष कार्य अधिकारी अविनाश रणखांब, विधिमंडळाचे जनसंपर्क अधिकारी नीलेश मदाने, ग्रंथपाल आणि उपग्रंथपाल अनुक्रमे नीलेश वडनेरकर आणि शत्रुघ्न मुळे उपस्थित होते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नांदेड वैद्यकिय रुग्णालयाच्या अधिष्ठाता व डॉक्टरवर अखेर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल