महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाचे कर्ज परतफेडीची मुदत संपलेल्या लाभार्थींकरिता संपूर्ण थकित कर्ज व्याजासह एक रकमी भरणा करणाऱ्यांकरिता एक रकमी परतावा योजना सुरू करण्यात आली आहे. महामंडळाच्या या योजनेचा जास्तीत जास्त लाभार्थीनी लाभ घ्यावा, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले आहे.राज्यातील बहुतेक सर्व जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या कर्ज परतफेडीचे मुदत संपलेले अनेक लाभार्थी असून कर्ज वसुलीसाठीचे प्रयत्न महामंडळामार्फत करण्यात येत आहेत. त्यासाठी ही योजना 31 मार्च 2023 पर्यंत राबविण्यात येणार आहे.
राज्यात मागील दोन वर्षांपासून उद्भवलेल्या कोविड 19 च्या गंभीर परिस्थितीमुळे बऱ्याच लाभार्थींचे व्यवसाय बंद झालेले आहेत.त्यांना अशा परिस्थितीत कर्ज परतफेड सुसह्य व्हावे व उदरनिर्वाहासाठी त्यांचे व्यवसाय पूर्ववत सुरु व्हावेत याकरीता महामंडळाने संपूर्ण थकित कर्ज व्याजासह एक रकमी भरणा करणाऱ्या लाभार्थींकरीता एक रकमी परतावा (One Time Settlement OTS) योजनेस मान्यता देण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून लाभार्थीला एकूण थकित कर्जातील व्याजाच्या रक्कमेत 50 टक्के इतकी भरीव सूट देण्यात येणार आहे.या योजनेस महामंडळाच्या दिनांक 15 मार्च 2022 रोजीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आलेली आहे. महामंडळाच्या या योजनेचा जास्तीत जास्त लाभार्थींनी लाभ घ्यावा, असे आवाहन मंत्री श्री. वडेट्टीवार यांनी केले आहे.