दक्षिण व पूर्व इंग्लंडमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या नवीन कोरोना विषाणूमुळे बाधित झालेला संशयित रुग्ण नागपुरात आढळला आहे. इंग्लंडहून परतलेल्या या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या नागपूर व गोंदियातील अनेकांना कोरोनाची बाधा झाली आहे. या रुग्णाला तातडीने मेडिकल रुग्णालयातील विशेष वार्डात दाखल करून त्याचे नमूने चाचणीसाठी पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळासह (एनआयव्ही) मेडिकलच्याही प्रयोगशाळेत तपासले जाणार आहेत.
नागपुरात नंदनवनमध्ये राहणारा हा २८ वर्षीय तरुण पुण्याच्या एका कंपनीत कार्यरत आहे. या कंपनीच्या कामासाठी तो एक महिन्यापूर्वी इंग्लंडला गेला होता. २९ नोव्हेंबरला नागपुरात परतल्यावर त्याला लक्षणे नव्हती. तरी प्रशासनाने त्याला गृह विलगीकरणात राहण्याची सूचना केली होती.
काही दिवसांनी त्याला करोनाची सौम्य लक्षणे दिसायला लागली. त्याने कोरोना चाचणी केली असता त्याला बाधा असल्याचे स्पष्ट झाले. विशेष म्हणजे, याच दरम्यान तो खासगी कामानिमित्त गोंदियालाही गेला होता. त्यामुळे या तरुणाच्या संपर्कात आलेले त्याच्या घरातील ४ ते ५ व्यक्ती तसेच गोंदियात संपर्कात आलेल्या ३ ते ४ व्यक्तींनाही कोरोना झाला. तातडीने त्याला मेडिकलमध्ये हलवण्यात आले. या रुग्णामुळे बऱ्याच व्यक्तींना बाधा झाल्याचे पुढे आल्याने नवीन विषाणूच्या भीतीमुळे महापालिका, जिल्हा प्रशासन, मेडिकलमध्ये चिंता वाढली आहे.