Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Wednesday, 2 April 2025
webdunia

हनुमानाचे जन्मस्थान अंजनेरी वाचवा, निसर्ग वाचवा मोहीम सुरू

aditya thackeray
, गुरूवार, 22 ऑक्टोबर 2020 (17:10 IST)
नाशिकमध्ये भगवान हनुमानाचे जन्मस्थान असलेल्या अंजनेरी येथे राखीव वन संवर्धन अंतर्गत सुरु झालेल्या ‘अंजनेरी वाचवा’ अभियान सुरु करण्यात आले आहे. शहरातील निसर्गप्रेमी, गिर्यारोहक यांनी मोठ्या प्रमाणावर यात सहभागी झाले आहेत. अभियानांतर्गत ४८ तासात १० हजार पेक्षा जास्त निसर्गप्रेमींनी ऑनलाईन विरोध नोंदवला आहे. अंजनेरी येथील जैवविविधतेचा ऱ्हास होऊ नये यासाठी नाशिककर एकत्र आहे आहेत. फेसबुक तसेच संबंधित सोशल मीडियावर या बाबत जनजागृती केली जात आहे. १४ किलोमीटरचा रस्ता झाल्यास मोठ्या प्रमाणात दुर्मिळ वनस्पती नामशेष होण्याच्या काळजीने सोशल मीडियावर या निर्णयाला मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे.
 
महाराष्ट्रातील विविध शहरांमधून ४८ तासांत १० हजार पेक्षा जास्त अंजनेरी प्रेमींनी या निर्णयाला ऑनलाईन विरोध दर्शवला आहे. शासनाच्या या निर्णयाला विरोध दर्शवण्यासाठी नेटीझन्सने डिजिटल अर्जावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. शहरातील निरनिराळ्या निसर्गप्रेमी संस्थांनी या मोहिमेस पाठिंबा दर्शवला आहे. संस्थांच्या माध्यमातून देखील सोशल मीडियावर जनजागृती केली जात आहे. मुळेगावातून थेट माथ्यापर्यंत १४ किलोमीटरचा रस्ता नेण्याचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाने वनविभागाला पाठवला आहे. या रस्त्याचा उद्देश पर्यटनविकास असा सांगितला जात असला तरी यातून होणाऱ्या वाढत्या मानवी हस्तक्षेपामुळे जैवविविधतेला हानी पोहोचू शकते अशी भूमिका निसर्गप्रेमींनी घेतली आहे. स्फोटकांचा वापर केल्यास दुर्मिळ प्रजाती नष्ट होण्याची शक्यता निसर्गप्रेमींनी वर्तवली आहे. मोहिमेत सहभागी होण्यासाठी http://bit.ly/save_anjaneri_wa येथे नोंदणी करा.
 
अंजनेरी हा नाशिक - त्र्यंबकेश्वर रांगेतील महत्त्वाचा किल्ला आहे. नाशिक - त्र्यंबकेश्वर रस्त्यावर नाशिकपासून २० कि.मी. अंतरावर अंजनेरी नावाचा फाटा आहे. अंजनेरी गावात गेल्यावर पायऱ्यांच्या वाटेने गडावर जाता येते. मुळेगावच्या वाटेनेही गडावर जाता येते. गडावरून बुधली नावाची अवघड वाटही खाली उतरते.
 
इतिहास
अंजनेरी  किल्ला जनमानसात परिचित आहे तो हनुमान-जन्मस्थानामुळे. पवनपुत्र हनुमानाचा जन्म या डोंगरावर अंजनी मातेच्या पोटी झाला, असे मानले जाते. म्हणूनच या किल्ल्याला 'अंजनेरी' नाव देण्यात आले. याच डोंगराच्या परिसरात हनुमान लहानाचे मोठे झाले असे समजले जाते. येथे १०८ जैन लेणी आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अजित पवार यांना कोरोना झाला की नाही वाचा पूर्ण बातमी