Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

विदर्भातील गावात न्यूड डान्सने खळबळ; चौकशीसाठी विशेष तपास पथक

विदर्भातील गावात न्यूड डान्सने खळबळ; चौकशीसाठी विशेष तपास पथक
, सोमवार, 24 जानेवारी 2022 (08:35 IST)
विदर्भातील एका गावात बैलगाडा शर्यती नंतर नग्न नृत्याचा कार्यक्रम आयोजित केल्याची धक्कादायक घटना समोर आल्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. नागपूरपासून १०० कि.मी. अंतरावर असलेल्या उमरेड तालुक्यातील ब्राम्हणी गावात हा प्रकार झाल्याचे सांगण्यात आहे. सदर व्हिडिओ हा सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर जिल्हा पोलिस अधिक्षकांनी विशेष तपास पथकाकडे (एसआयटी) या प्रकरणाचा तपास दिला आहे.
 
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. १७ जानेवारी रोजी गावातील ब्राह्मणी गावातील गावकऱ्यांनी शंकरपट म्हणजे बैलगाडी शर्यतीचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात मोठ्या संख्येने युवक सहभागी झाले होते. कार्यक्रमाचा आनंद घेतल्यानंतर आयोजकांमधील काही जणांनी तरुणांना नग्न नृत्य करण्यासाठी १०० रुपये प्रतिव्यक्ती देण्याचे आमिष दाखवले. त्यानंतर तेथे नग्न नृत्य झाले. या प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली. अखेर त्याची दखल घेत नागपूर ग्रामीणचे पोलिस अधिक्षांनी चौकशीचे आदेश दिले. त्यानंतर ३ जणांना अटक करण्यात आली आहे. तसेच एसआयटी तपासाचेही आदेश देण्यात आले आहेत.
 
नग्न नृत्याची घटना गावात घडलीच नसल्याचे सरपंच आणि काही ग्रामस्थांनी म्हटले आहे. सरपंच रितेश अंबोन यांनी दावा केला आहे की, हे प्रकरण आमच्या गावातील नाही. तसेच व्हायरल झालेला व्हिडिओ सुध्दा आमच्या गावचा नाही. मात्र आम्ही शंकरपटाचे आयोजन केले होते आणि त्यानंतर लावणीचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यामध्ये कोणतीही नग्नता किंवा अश्लीलता नव्हती, असे त्यांनी स्पष्ट केले.
 
पोलिस उपअधिक्षक पुरंदरे यांनी सांगितले की, सरपंच खोटे बोलत आहेत. आम्ही प्रकरणाचा तपास करत आहोत. स्थानिक पोलिस आणि कार्यक्रमाचे आयोजक यांच्यात काही हातमिळवणी आहे का? हे आम्ही पडताळून पाहत आहोत. गावातील तीन जणांना अटक केली आहे. कार्यक्रम आयोजित करण्यात त्यांचा काही सहभाग आहे की नाही? याचा तपास सुरू आहे. दरम्यान, या प्रकरणामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

महापालिकेकडून स्वच्छ सर्व्हेक्षण आणि ‘माझी वसुंधरा’साठी ब्रँड अँबेसिडरची घोषणा