आज नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात (9 जून) नरेंद्र मोदी यांचा पंतप्रधानपदाचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे.यामध्ये महाराष्ट्रातून भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेतील काही नेतेही मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. पण अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतून यावेळी कुणीही मंत्रिपदाची शपथ घेणार नसल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
"राष्ट्रवादीला आमच्याकडून एक राज्यमंत्रिपद ॲाफर करण्यात आलं होतं. प्रफुल्ल पटेल यांचं नाव फायनल देखील झालं होतं. पण ते कॅबिनेटमंत्री राहिले आहेत. त्यांना राज्यमंत्री करता येणार नाही, असं राष्ट्रवादीच्या नेत्यांचं मत होतं. म्हणून यावेळेस केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश करता आला नाही. पण भविष्यात त्यांचा विचार होईल," असं देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत मीडियाशी बोलताना सांगितलं आहे.
लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे केवळ सुनील तटकरेचं निवडून आले आहेत. तर प्रफुल्ल पटेल हे सध्या राज्यसभेवर खासदार राहिले आहेत.
प्रफुल्ल पटेल UPA सरकारच्या काळात कॅबिनेट मंत्री होते. त्यामुळे नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातही कॅबिनेट मंत्रिपद द्यावं अशी मागणी केल्याची सांगण्यात येत आहे.
मोदी सरकार मध्ये रक्षा खडसे, मुरलीधर अण्णा मोहोळ सारखे तरुण खासदारांचा मंत्रिमंडळात समावेश आहे. तर प्रतापराव जाधव यांच्या सारखे ज्येष्ठ नेते देखील आहे. मी या सर्वांचे अभिनंदन करतो.