"अजित पवार यांना झोपेत सरकार कसं बनवतात ते माहिती आहे. पण ते टिकवता येत नाही," असं खोचक उत्तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अजित पवारांना दिलं आहे
अजित पवारांनी कालच पुण्यात माध्यमांशी बोलताना 'पहाटेच्या शपथविधी'वरून भाजपवर निशाणा साधला होता. त्याला चंद्रकांत पाटलांनी उत्तर दिलंय.
अजित पवार म्हणाले होते, "चंद्रकांत पाटील मोठा माणूस आहेत. ते म्हणाले आहेत की, मी जर बोलायला लागलो तर फार फटकळ आहे. अमकंय तमकंय. कशाला उगाच त्यांच्या नादी लागायचं. आपलं दुरून डोंगर साजरे."
"मी वाटच पाहतोय की सरकार कधी पडतंय. सारखा झोपेतून उठतो की पडलं का काय सरकार? लगेच टीव्ही लावतोय. हे चॅनेल लाव, ते चॅनेल लाव. कितीदा सांगायचं की, हे तीन नेते एकत्र आहेत तोपर्यंत कुणी मायचा लाल हे सरकार पाडू शकत नाही," असं अजित पवार म्हणाले होते.
या टीकेला उत्तर देताना चंद्रकांत पाटलांनी अजित पवारांवर जोरदार टीका केली.
"अजित पवार यांना झोपेत सरकार कशी करतात ते माहिती आहे. पण ते टिकवता येत नाही. 54 आमदारांच्या सह्यांचं पत्र ड्रॉवरमधून कुणी काढलं? राज्यपालांना कुणी सांगितलं की 54 आमदारांचा पाठिंबा आहे? अशाप्रकारे सरकार बनवणाऱ्यांनी खरं तर जपून बोललं पाहिजे," असं चंद्रकांत पाटील म्हणाले.