Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अकोला : 'हिंदू असूनही बुरखा का घातला,' असं म्हणत जमावाची तरुणीच्या प्रियकराला मारहाण

अकोला : 'हिंदू असूनही बुरखा का घातला,' असं म्हणत जमावाची तरुणीच्या प्रियकराला मारहाण
, सोमवार, 13 डिसेंबर 2021 (15:58 IST)
हिंदू असूनही एका तरुणीने बुरखा घातल्याचा संशय आल्याने जमावाने प्रियकरासह त्याच्या मित्राला बेदम मारहाण केल्याची घटना अकोल्या घडली आहे. हे तरुण आणि तरुणी हिंदू समाजाचे होते. जमावाने भर रस्त्यात या मुलीला बुरखा उतरवायला भाग पाडले.
मारहाणीचा व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर अकोला शहरातील उरळ पोलिसांनी याची दखल घेत मारहाण करणाऱ्या 2 तरुणांना अटक केली आहे. ही घटना 8 दिवसांपूर्वीची असल्याची माहिती पोलिसांनी बीबीसीला दिली आहे.
प्रकरण काय?
अकोल्यात गेगा पेट्रोल पंप भागात काही तरुणांना एका स्कुटीवर एक बुरखा घातलेली तरुणी दोन मुलांसोबत जातांना दिसली. हा अपहरणाचा प्रकार तर नाही अशी शंका काही तरुणांना आली. त्यांनी स्कुटी अडवून विचारपूस केल्यावर या तिघांकडून उडवाउडवीचे आणि संशयास्पद उत्तर मिळाले.
अधिक विचारपूस केली असतांना तिघेही हिंदू असल्याचे लक्षात आले. त्यानंतर जमावाने खोटे का बोलता, धर्माची बदनामी का करता, असं सांगत त्या तरुणांना मारहाण केली.
या घटनेनंतर त्या तिघांना सोडून देण्यात आलं. याप्रकरणी कुणीही फिर्याद दाखल केली नाही. मात्र व्हीडीओ व्हायरल झाल्यावर अकोला पोलिसांनी स्वतःहून गुन्हा दाखल करून, व्हीडीओच्या आधारे ओळख पटवून मारहाण करणाऱ्या दोन तरुणांना अटक केली आहे.
घटनेनंतर स्कुटीवर आलेल्या तिन्ही तरुण, तरुणी बुलडाण्याच्या दिशेने निघून गेल्याचे उरळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अंनतराव वडतकर यांनी सांगितले. या घटनेला कुठलीही धार्मिक बाजू नसल्याचेही वडतकर यांनी स्पष्ट केले.
 
व्हीडिओत काय दिसतं?
व्हीडिओत बुरखा घातलेल्या तरुणीसोबत असलेल्या तरुणाला जमावाने ज्यामध्ये बहुतांश पेट्रोल पंप कंपनीतील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे, हे सर्वजण मारहाण करताना दिसत आहेत. या तरुणीला बुरखा काढण्यास जमाव सांगत आहे.
घाबरलेली तरुणी त्यांना हात जोडून म्हणते, "मला माफ करा, मी हिंदू असून प्रियकराने मला बुरखा घालायला सांगितला होता. आम्हाला वाढदिवस साजरा करायचा होता. आम्ही कुणाच्या नजरेत येऊ नये म्हणून बुरखा घातला. आम्हाला माफ करा, मारू नका."
मात्र संतप्त जमावाने तुम्ही धर्माची बदनामी करता, असं म्हणत या तरुणाला लाथाबुक्क्यानी मारहाण केल्याचं स्पष्ट दिसत आहे. या सर्व घटनेचा व्हीडिओसुद्धा काढा अशा सूचनाही जमावाकडून येत होत्या. यापैकी कुणीतरी हा व्हीडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला, हा व्हीडिओ समाजमाध्यमावर व्हायरल झाला. त्यानंतर ही कारवाई करण्यात आलीआहे.
अकोला पोलिसांनी याप्रकरणी जोडप्याला मारहाण करणाऱ्या 2 तरुणांना ताब्यात घेतले. त्यांच्याविरुद्ध कलम 151 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना अटकही करण्यात आली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

जम्मू काश्मीरमध्ये भारतीय जवानाची आत्महत्या