राम मंदिराच्या जमीन खरेदी दरम्यान भ्रष्टाचार झाल्याच्या आरोपांवरून शिवसेनेने टीका केल्यानंतर बुधवारी (16 जून) सेना भवनसमोर भाजप युवा मोर्चाकडून आंदोलन सुरु असताना शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला. यावेळी भाजपच्या पदाधिकाऱ्यांसह महिला कार्यकर्त्यांनाही शिवसैनिकांनी मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणी भाजपच्या अक्षता तेंडुलकर यांच्या तक्रारीनंतर शिवसेनेच्या माजी महापौर श्रद्धा जाधव यांच्यासह सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवसेना ही बाळासाहेबांची शिवसेना नाही तर सोनियांची सेना झाली आहे अशी टीका अक्षता तेंडुलकर यांनी केली.
त्या म्हणाल्या, "आंदोलन संपल्यानंतर आम्ही गाडी काढण्यासाठी गेलो असताना शिवसैनिकांनी मागून हल्ला केला. आम्हाला लाथा बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. आमदार सदा सरवणकर, श्रद्धा जाधव यांच्या सांगण्यावरून आपल्यावर हल्ला करण्यात आला," असा आरोप करण्यात आला आहे.