नोंदणी व मुद्रांक विभागामार्फत दंड माफी अभय योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत थकीत मुद्रांक शुल्क भरण्याचा पहिला टप्पा ३१ जुलै २०२२ पर्यंत संपणार असल्याचे नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक श्रावण हर्डीकर यांनी सांगितले असून राज्यातील सर्व मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालय शनिवार ३० जुलै व रविवार ३१ जुलै रोजी फक्त याच कामासाठी सुरू ठेवण्यात येणार असल्याचे नाशिकचे सह जिल्हा निबंधक वर्ग १, तथा मुद्रांक जिल्हाधिकारी कैलास दवंगे यांनी कळविले आहे.
या संदर्भात जारी करण्यात आलेल्या शासकीय प्रसिध्दी पत्रकात नमूद केल्यानुसार, दंड माफी अभय योजनेअंतर्गत नागरिकांनी ३१ जुलै २०२२ पर्यंत सहभाग नोंदवल्यास थकलेल्या मुद्रांक शुल्काच्या दंडास साधारण ९० टक्के माफी शासनामार्फत देण्यात येणार आहे. तसेच १ ऑगस्ट २०२२ नंतर सहभाग नोंदविल्यास थकलेल्या मुद्रांक शुल्काच्या दंडास ५० टक्के माफी देण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने ३१ जुलै २०२२ पर्यंत या योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन नाशिकचे सह जिल्हा निबंधक वर्ग १, तथा मुद्रांक जिल्हाधिकारी कैलास दवंगे यांनी केले आहे.
शनिवार ३० जुलै व रविवार ३१ जुलै २०२२ रोजी शासन जमा झालेली चलने त्याच दिवशी किंवा १ ऑगस्ट २०२२ पर्यंत स्वीकारण्यात येतील, असे निर्देश प्राप्त झाले असल्याची माहिती नाशिकचे सह जिल्हा निबंधक वर्ग १, तथा मुद्रांक जिल्हाधिकारी कैलास दवंगे यांनी दिली आहे.