Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर लागलेले आरोप गंभीर – शरद पवार

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर लागलेले आरोप गंभीर – शरद पवार
, सोमवार, 22 मार्च 2021 (07:45 IST)
गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेले आरोप गंभीर आहेत, उत्तम अधिकाऱ्यांकडून आरोपांची चौकशी करावी. चौकशीअंती मुख्यमंत्री निर्णय घेतील, त्यांना निर्णय घेण्याचे सर्व अधिकार आहेत, असे मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मांडले.
 
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी बदलीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवत राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. या प्रकरणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यावर काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं. शरद पवार यांनी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत या मुद्द्यावर भाष्य करत भूमिका मांडली.
 
पवार म्हणाले, ‘परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेले आरोप गंभीर आहेत. या प्रकरणात गृहमंत्र्यांचं म्हणणं ऐकून घेतलं जाईल. परमबीर सिंग मलाही भेटले होते. पण, त्यांनी फक्त त्यांच्या बदलीबद्दल म्हणणं मांडलं होतं. त्याचबरोबर माझ्या खात्यात राजकीय हस्तक्षेप होत असल्याचं म्हटलं होतं. त्यापलीकडे त्यांनीही मला काहीही सांगितलं नाही.
 
पत्रकार परिषदेपूर्वीच माझं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणं झालं आहे. देशमुख यांच्याबद्दलचा निर्णय सर्वांशी बोलून घेतला जाईल. यासंदर्भातील सर्व अधिकार मुख्यमंत्र्यांकडे आहेत. त्यांनी योग्य ती चौकशी करून निर्णय घ्यावा. मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन चर्चा करणार आहे, असं शरद पवार यांनी सांगितलं.
 
परमबीर सिंग यांच्या पत्राचे दोन भाग आहेत. एक मोहन डेलकर प्रकरणावर आहे तर दुसरा वाझे प्रकरणावर आहे डेलकर यांनी मुंबईत आत्महत्या केली होती. या पत्रात अत्यंत गंभीर आरोप करण्यात आले आहेत. अनिल देशमुख यांचीही बाजू ऐकून घ्यावी लागेल. याबाबत सर्वांशी बोलून निर्णय घेऊ, गृहमंत्रीपदाबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील असे शरद पवार म्हणाले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

राज्यात सर्वाधिक 30,535 नव्या कोरोना रुग्णांची वाढ