Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अजित पवारांसोबत राष्ट्रवादीतल्या ‘या’ 8 नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली

अजित पवारांसोबत राष्ट्रवादीतल्या ‘या’ 8 नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली
, रविवार, 2 जुलै 2023 (16:02 IST)
महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते अजित पवार यांनी पक्षात बंड करत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची, तर राष्ट्रवादीतल्या 8 नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.
 
राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी या बंडाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पाठिंबा नसल्याचं म्हटलंय. त्यामुळे अजित पवार यांचं हे बंड असल्याचं स्पष्ट आहे.
 
अजित पवारांनी यावेळी राष्ट्रवादीतला मोठा गट फोडल्याचं समोर आलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल हे मात्र अजित पवारांसोबत शपथविधी सोहळ्याला दिसून आले आहेत.
 
छगन भुजबळ, धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ यांसारखे राष्ट्रवादीतील वरिष्ठ नेतेही अजित पवारांसोबत बंडात सहभागी झाले आहेत.
 
अजित पवारांसोबत कुणी कुणी मंत्रिपदाची शपथ घेतली :
1) छगन भुजबळ – राष्ट्रवादीतील ज्येष्ठ नेते असलेले छगन भुजबळ यांनी गेल्या दोन दशकात विविध मंत्रिपदं सांभाळली. ते आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी दोन ते अडीच वर्षे तुरुंगातही होते. शरद पवारांचे राष्ट्रवादीच्या स्थापनेच्या आधीपासूनचे ते सहकारी आहेत. शिवसेनेतून राष्ट्रवादीत गेलेले भुजबळ नंतर पवारांसोबत राष्ट्रवादीची स्थापना करतानाही सोबत होते. मात्र, आता अजित पवारांसोबत ते बंडात सहभागी झाले आहेत.
 
2) दिलीप वळसे पाटील – राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते असलेले दिलीप वळसे पाटील हे महाविकास आघाडी, तसं त्यापूर्वी काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार असताना विविध मंत्रिपदी होते. शरद पवारांचे निकटवर्तीय अशी त्यांची राष्ट्रवादीत आणि राजकारणात ओळख आहे. आता तेही अजित पवारांसोबत बंडात सहभागी झाले आहेत.
 
3) हसन मुश्रीफ – कोल्हापुरातील राष्ट्रवादीचा चेहरा म्हणून हसन मुश्रीफ यांची ओळख आहे. मुश्रीफ हे शरद पवार यांचे समर्थक मानले जातात. काही दिवसांपूर्वी त्यांच्यामागे ईडीनं चौकशीचा ससेमिराही लावला होता. त्यावरून भाजपनं मुश्रीफ यांच्यावर टीकेचा भडीमार केला होता. मात्र, आता भाजपच्या सत्तेतच ते सहभागी झाले आहेत.
 
4) धनंजय मुंडे – गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे असलेले धनंजय मुंडे यांनी भाजपची साथ सोडून राष्ट्रवादीचा हात धरला. त्यानंतर राष्ट्रवादीत मंत्रिपदही त्यांना मिळालं. अजित पवारांचे निकटवर्तीय म्हणूनच त्यांची महाराष्ट्रात ओळख आहे.
 
5) धर्मरावबाबा अत्राम – गडचिरोलीच्या अहेरीचे धर्मरावबाबा अत्राम हे राष्ट्रवादीचे आमदार आहेत.
 
6) आदिती तटकरे - राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांच्या कन्या आणि रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन मतदारसंघाच्या आमदार असलेल्या आदिती तटकरे यांनी अजित पवारांच्या बंडात सहभाग घेतला आहे.
 
7) संजय बनसोडे - लातूरच्या उदगीरमधील राष्ट्रवादीचे आमदादर संजय बनसोडे हे अजित पवारांचे समर्थक मानले जातात. यापूर्वी त्यांनी राज्यमंत्रिपदी काम केलं होतं.
 
8) अनिल पाटील – जळगाव तालुक्यातील अमळनेर मतदारसंघातून अनिल पाटील हे राष्ट्रवादीचे आमदार आहेत.
 



Published By- Priya Dixit
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अजित पवार अब तक – हुकलेल्या मुख्यमंत्रिपदापासून पाचव्यांदा उपमुख्यमंत्रिपदापर्यंत..