"अमृता फडणवीस यांना काही काम नाही, भाजपने त्यांची प्रवक्तेपदी निवड करावी," असा टोला शिवसेना नेत्या मनिषा कायंदे यांनी लगावला आहे. पुणे मेट्रो प्रकल्पाच्या कामावरुन अमृता फडणवीस यांनी राज्य सरकारवर टीका केली होती.
"काम एक करतं आणि हार दुसरेच घालून जातात," असं म्हणत अमृता फडणवीसांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला होता.
यावर प्रतिक्रिया देताना मनिषा कायंदे म्हणाल्या, "अमृता फडणवीस यावेळेस पुण्याला फिरायला गेल्या होत्या. तिथे त्यांनी नेहमीप्रमाणे राजकीय वक्तव्य केलं. सध्या त्यांच्याकडे कोणतेही काम नाही. त्यामुळे भाजपने त्यांची प्रवक्तेपदी निवड करावी."
"राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल केले असताना पुण्यात मात्र नियम काय ठेवण्यात आले आहेत. पुण्यात पॉझिटिव्हिटी रेट कमी असून राज्य सरकारने असं का केलं?" असा प्रश्नही अमृता फडणवीस यांनी उपस्थित केला.
मनिषा कायंदे यांच्यापाठोपाठ मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनीही यासंदर्भात आपली प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या, "कोण अमृता फडणवीस? देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी ना? नावडतीचं मीठ आळणी अशी त्यांची अवस्था झाली आहे." असा टोलाही त्यांनी लगावला.