Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राज्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी ” मी जबाबदार” या मोहिमेची घोषणा

राज्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी ” मी जबाबदार” या मोहिमेची घोषणा
, सोमवार, 22 फेब्रुवारी 2021 (07:35 IST)
मास्क घाला, शिस्त पाळा आणि लॉकडाऊन टाळा असे स्पष्टपणे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी ”मी जबाबदार” या मोहिमेची घोषणा केली. गर्दी वाढत असून राजकीय, सामाजिक, धार्मिक अशा कार्यक्रमांना परवानगी मिळणार नाही तसेच नियम न पाळणारेही मंगल कार्यालये, सभागृहे, हॉटेल्स, उपाहारगृहे यांच्यावर कडक कारवाई करण्याचे निर्देश प्रशासनाला दिल्याचेही ते म्हणाले. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनतेला समाजमाध्यमांतून संबोधित करीत होते.
 
संसर्ग रोखण्यासाठी अमरावती विभागात कडक निर्बंध घालण्यात आले आहेत त्याचा संदर्भ देऊन मुख्यमंत्री म्हणाले की, जिथे जिथे आवश्यकता असेल तिथल्या जिल्हा प्रशासनाने आवश्यक ते निर्बंध घालण्याचे निर्देश आपण दिले आहेत.
 
पुढील 8 दिवसांत जनतेने निर्णय घ्यावा
कोविड परिस्थितीत आपल्याला जनतेशी या माध्यमातून संवाद करताना समाधान मिळते आणि आपण देखील मला परिवाराचा एक सदस्य म्हणून माझे ऐकता असे सांगून मुख्यमंत्र्यांनी राज्यात लॉकडाऊन लावायचा की नाही याचा निर्णय पुढील ८ दिवसांत जनतेने करायचा आहे असे सांगितले.
 
विदर्भातील काही जिल्ह्यांसह मुंबई आणि पुण्यासारख्या प्रमुख शहरांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने चिंता वाढली आहे. त्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हद्वारे जनतेशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, उद्यापासून सर्व राजकीय, सामाजिक, धार्मिक मिरवणुका मोर्चे, यात्रांवर काही दिवसांसाठी बंदी असणार आहे, तसेच, येत्या आठ ते दहा दिवसांत परिस्थिती पाहून लॉकडाऊनचा निर्णय घेतला जाईल.
 
तसेच, कारण नसताना उगाच कुणी आपल्याला घरात बंद करून ठेवणं हे कुणालाच आवडणार नाही. पुढील दोन महिन्यात आणखी एक-दोन कंपन्या आपल्याला लस उपलब्ध करून देणार आहेत. लसीकरणाचे कोणतेही साईडइफेक्ट नाही. लवकरच सर्वसामांन्यांना लस मिळणार. आतापर्यंत नऊ लाखांच्या आसपास लसीकरण झालं. मास्क हीच आपली कोरोनाच्या लढाईतली ढाल आहे. त्यामुळे लस घेण्या अगोदर व नंतर देखील मास्क घालणं अनिवार्य आहे. शिस्त पाळणं हे आवश्यक आहे. संसर्गाची साखळी तोडायची असेल तर संपर्क टाळा. नियम मोडणाऱ्यांवार कडक कारवाई होणार, असं देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.
 
उद्या रात्रीपासून जिथे योग्य वाटतेय तिथे बंधने घाला, पण जनतेला 24 तासांचा वेळ द्या, असे आदेशही मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना, पालकमंत्र्यांना यावेळी दिले आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

राज्यात रविवारी ६९७१ कोरोना रुग्णांची भर