नांदेड : तुरुंगाच्या भीतीने सोनिया गांधींसमोर रडल्याचा आरोप राहुल गांधी यांनी अशोक चव्हाण यांच्यावर नाव न घेता केला होता. मात्र, गांधींच्या या आरोपावर अशोक चव्हाणांनी प्रत्युत्तर दिले असून सर्व आरोप फेटाळले आहेत.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप दादरच्या शिवाजी पार्क मैदानात इंडिया आघाडीच्या सभेने झाला. लोकसभा निवडणूक २०२४ च्या पार्श्वभूमीवर देशातील इंडिया आघाडीने या सभेतील प्रचाराचा नारळ फोडला. याच सभेत भाष्य करताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी नुकताच काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमधून राज्यसभेत गेलेल्या खासदार अशोक चव्हाण यांच्यावर निशाणा साधाला होता. यावर भाजप राज्यसभा खासदार अशोक चव्हाण यांनी आज (१८ मार्च) माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी राहुल गांधी यांच्या आरोपांवर चव्हाणांनी प्रत्युत्तर दिले. राहुल गांधींचं वक्तव्य हास्यास्पद असून मी सोनिया गांधींना भेटलो नाही असे प्रत्युत्तर अशोक चव्हाण यांनी दिले.
राहुल गांधी यांनी काल काही विधाने करताना कोणाचे नाव घेतलेले नाही. मात्र, ते विधान माझ्यासंदर्भात असेल तर ते हास्यास्पद आणि अतार्किक आहे. कारण राजीनामा देण्यापूर्वी मी सोनिया गांधींना भेटलेलो नाही. त्यामुळे त्यांना भेटून मी काही भावना व्यक्त केल्याचे विधान चुकीचे आहे, दिशाभूल करणारे आहे, तथ्यहिन आहे.
Edited by Ratnadeep Ranshoor