Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मिलिंद देवरा, अशोक चव्हाण यांना राज्यसभेची उमेदवारी, मेधा कुलकर्णी यांनाही संधी

ashok chavan
, बुधवार, 14 फेब्रुवारी 2024 (16:02 IST)
केवळ एक दिवसापूर्वी भाजपात आलेल्या माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना भारतीय जनता पार्टीमधून राज्यसभेची उमेदवारी मिळाली आहे. तसेच काही दिवसांपूर्वी काँग्रेसमधून शिवसेना शिंदे गटात आलेल्या मिलिंद देवरा यांनाही शिंदे गटातर्फे उमेदवारी मिळाली आहे. असं असलं तरी भाजपाने आपल्या जुन्या कार्यकर्त्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनाही राज्यसभेची उमेदवारी देऊन मूळ भाजपा आणि नंतर आलेले नेते असा समतोल साधला आहे.
 
भाजपाने महाराष्ट्रातून मेधा कुलकर्णी, अशोक चव्हाण यांच्याबरोबर नांदेडचे डॉ. अजित गोपछडे यांनाही तिकीट जाहीर केलं आहे. अशा प्रकारे महायुतीतर्फे 4 उमेदवारांची घोषणा झाली आहे. अद्याप अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने आपला उमेदवार जाहीर केलेला नाही.
 
काँग्रेसने राज्यसभेसाठी महाराष्ट्रातून चंद्रकांत हांडोरे यांना उमेदवारी दिली आहे. चंद्रकांत हांडोरे हे माजी मंत्री असून त्यांना 2022 साली झालेल्या विधानपरिषद निवडणुकांत पराभव स्वीकारावा लागला होता.
 
2019 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत अशोक चव्हाण यांना भाजपाच्या प्रतापराव चिखलीकर यांनी पराभूत केलं होतं. आता अशोक चव्हाणच भाजपात येऊन राज्यसभेत जात आहेत.
 
तसेच गोपछडेही राज्यसभेत गेल्यास मराठवाड्यातल्या या एका जिल्ह्यातून संसदेत तीन खासदार जातील आणि तिन्ही एकाच पक्षाचे असतील.
 
मेधा कुलकर्णी या कोथरुडच्या माजी आमदार तसेच पुणे महानगरपालिकेतील माजी नगरसेविका आहेत. कोथरुड मतदारसंघातून गेल्या विधानसभा निवडणुकीच्यावेळेस चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी मिळाल्यामुळे त्या प्रचंड नाराज झाल्या होत्या. त्यांना विधानपरिषदेचे आश्वासनही देण्यात आले होते.
 
मात्र गेल्या पाच वर्षांत झालेल्या विधानपरिषद निवडणुकांत त्यांना संधी मिळाली नाही. अखेर त्यांना आता थेट संसदेत जाण्याची संधी मिळाली आहे. मेधा कुलकर्णी पुणे महानगरपालिकेत तीनवेळा नगरसेविका म्हणून निवडून गेल्या होत्या तसेच 2014 साली त्या विधानसभेत निवडून गेल्या होत्या.
 
मिलिंद देवरा यांनी आपलं दोन पिढ्यांचं काँग्रेसशी असलेलं नातं संपवून शिंदे गटामध्ये प्रवेश केला होता. त्यांनाही आता राज्यसभेचं तिकीट मिळालं आहे.
 
राज्यसभेचं स्वरूप
राज्यसभेला अप्पर हाऊस म्हणजेच वरिष्ठ सभागृह किंवा काऊन्सिल ऑफ स्टेट्स असंही संबोधलं जातं. स्वातंत्र्यानंतर पहिल्या निवडणुकीनंतर लोकसभेबरोबरच आणखी एक सभागृह असावं अशी कल्पना समोर आली.
 
वरिष्ठ सभागृह असं संबोधण्यात येत असलं तरी राज्यसभेच्या तुलनेत लोकसभेचे अधिकार थोडे जास्त आहेत.राज्यसभेत जास्तीत जास्त 250 जागा असू शकतात. यापैकी 12 सदस्य राष्ट्रपतींकडून नामनिर्देशित केले जातात. तर 236 सदस्य देशातील सर्व राज्यांतून आणि 2 सदस्य केंद्रशासित प्रदेशांतून निवडले जातात.
 
सध्या राज्यसभेची सदस्य संख्या 245 इतकी आहे. यापैकी 233 सदस्य राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातून निवडून येतात. तर 12 सदस्यांना राष्ट्रपती नामनिर्देशित करतात.
 
राष्ट्रपतींनी नामनिर्देशित केलेले उमेदवार प्रामुख्याने कला, विज्ञान, सामाजिक कार्य अशा क्षेत्रांशी निगडित असतात.
 
राज्यसभा हे स्थायी सभागृह
राज्यसभा स्थायी सभागृह आहे. हे कधीच भंग होत नाही. भारताचे उपराष्ट्रपती या सदनाचे सभापती असतात. इथल्या सदस्यांचा कार्यकाळ सहा वर्षांचा असतो. दर दोन वर्षांनी एक तृतीयांश सदस्यांचा कार्यकाळ संपुष्टात येतो. त्यांच्या जागी नवे उमेदवार राज्यसभेवर निवडून जातात.
 
राज्यसभेच्या कार्यकाळाचा इतिहासही रंजक आहे. जेव्हा पहिल्यांदा निवडणुका झाल्या तेव्हा सहा वर्षांनी सगळेच निवृत्त झाले तर एक तृतीयांश सदस्य कसे निवृत्त होतील असा पेच उभा राहिला. तेव्हा लकी ड्रॉ काढण्यात आला. काही सदस्यांना 2 वर्षं, काहींना 4 वर्षं तर काहींना सहा वर्षं असा कार्यकाळ देण्यात आला.
 
त्यामुळे पहिल्या निवडणुकीनंतर ज्या सदस्यांचा कार्यकाळ संपला त्यांच्या जागी निवडणुका होऊ लागल्या आणि ही प्रक्रिया सुकर झाली.
 
राज्यसभा सदस्य होण्यासाठी पात्रता
भारतीय संविधानातील कलम 84 नुसार राज्यसभा सदस्यत्वासाठी काही अटी घालण्यात आल्या आहेत.
 
संबंधित उमेदवार देशाचा नागरिक असावा ही पहिली अट आहे. त्याने वयाची 30 वर्षं पूर्ण केलेली असावीत. तसंच संसदेने वेळोवेळी ठरवून दिलेल्या अटी त्याने पूर्ण केल्या पाहिजेत.
 
कोणत्या राज्यात किती जागा?
राज्यसभेत कोणत्या राज्यातून किती जागा निवडून जातील हे त्या राज्याच्या लोकसंख्येवरून ठरवलं जातं.
 
राज्यसभेच्या सदस्यांची निवड विधानसभेत निवडून गेलेल्या आमदारांकडून केली जाते. प्रत्येक राज्यातील विधानसभा आमदारांची संख्या तिथल्या लोकसंख्येवर आधारित असते.
 
उदाहरणार्थ, महाराष्ट्रात राज्यसभेच्या 19 जागा आहेत. उत्तर प्रदेशात त्या 31 आहेत. अरूणाचल प्रदेश, मणिपूर, नागालँड, मेघालय, गोवा, मिझोरम, सिक्कीम, त्रिपुरा यांसारख्या लहान राज्यांमध्ये प्रत्येकी एक जागा आहे.
 
पण राज्यसभेची निवडणूक प्रक्रिया इतर निवडणुकांपेक्षा वेगळी असते.
 
राज्यसभेत पोहोचण्यासाठी किती मतं आवश्यक?
राज्यसभा निवडणूक विजयी होण्यासाठी कोणत्याही उमेदवाराला ठराविक मतं आवश्यक असतात. या मतांची संख्या जागेच्या संख्येवर अवलंबून असते. ही निवड प्रक्रिया आपण सोप्या पद्धतीने समजून घेऊ.
 
महाराष्ट्रात 288 विधानसभा आमदार आहेत तर राज्यसभेच्या एकूण 19 जागा आपल्या राज्यात आहेत.
 
पण एकाच वेळी सर्वच्या सर्व जागांवर राज्यसभेच्या निवडणुका होत नसतात. ठराविक कालावधीनंतर ठराविक जागांसाठी निवडणूक होते.
 
राज्यसभा निवडणुकीसाठीच्या जागांच्या संख्येत 1 ही संख्या मिसळून विधानसभेच्या जागांच्या संख्येला या संख्येने विभाजित केल्यानंतर विजयासाठी आवश्यक ती मतसंख्या आपल्याला मिळते.
 
Published By - Priya Dixit 
 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कुळ कायदा काय आहे? कुळाची जमीन वर्ग-2 मधून वर्ग-1 कशी करायची?