मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पैठणमधील एका कार्यक्रमात महात्मा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्यात जोरदार राजकारण तापले आहे. पिंपरी-चिंचवड येथे समता सैनिक दलाच्या कार्यकर्त्याकडून शाई फेक झाल्यानंतर या कार्यकर्त्यावर दाखल केलेल्या गुन्ह्यांवरून भाजप आणि सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका होत आहे. अशातच आता पिंपरी चिंचवडच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेऊन या प्रकरणात मध्यस्थी करावी अशी विनंती केली. यानंतर राज ठाकरे यांनी एक प्रसिद्धी पत्रक ट्विट केले आहे. यामध्ये आपली भूमिका मांडली आहे.
राज ठाकरे म्हणाले, " लोकशाहीमध्ये एखादी गोष्ट चुकली तर निषेध व्हायलाच हवा, आम्ही पण 'मनसे स्टाईल'ने अनेकवेळा निषेध नोंदवतो. पण हे करताना काही संकेत असतात. सध्या महाराष्ट्रात महापुरुषांवरून विधानं करून माथी भडकवण्याचे उद्योग सुरु आहेत आणि त्या वादांमधून मतं मिळवण्याची केविलवाणी धडपड सुरु आहे. त्यामुळे एखादं विधान आलं की त्याचे संदर्भ न तपासता कार्यकर्त्यांना भडकवून, स्वतः नामानिराळं राहण्याचे प्रकार महाराष्ट्रात वाढायला लागलेत. मग ह्यांचे कार्यकर्ते पण कसलाच विचार न करता, कसलीही खातरजमा न करता, वाट्टेल त्या मार्गाने निषेध करत सुटतात."
असाच प्रकार, राज्यातील विद्यमान मंत्री, भाजपाचे राज्यातील ज्येष्ठ नेते आणि माझे मित्र श्री. चंद्रकांत पाटील ह्यांच्या बाबतीत घडला. एका कार्यक्रमात त्यांच्या चेहऱ्यावर शाई फेकण्यात आली. एक बरं झालं, की चंद्रकांत दादांच्या डोळ्याला कोणतीही इजा झाली नाही. हे झाल्यावर पोलीस आयुक्तांनी तिथे हजर असलेल्या ११ पोलिसांचं निलंबन केलं आणि आरोपींवर भारतीय दंडसंहितेच्या अंतर्गत अनेक कलमांच्या जोडीला, कलम ३०७ देखील लावलं. हे कलम सदोष मनुष्यवधाचं कलम आहे. हे सगळं जेंव्हा मला कळलं तेंव्हा मला सर्वप्रथम हळहळ वाटली ती माझ्या पोलीस बांधवांबद्दल. पोलिसांना हा प्रकार रोखता आला नाही हे मान्य, पण तरीही त्यांच्यावरची कारवाई मला तरी अनाठायी वाटली आणि त्यामुळे मी अस्वस्थ होतो, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.