Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ज्ञानेश्वरी ग्रंथाचे ऑडिओ बुक; राज्य मराठी विकास संस्थेचा पुढाकार

subhas desai
, मंगळवार, 12 एप्रिल 2022 (21:43 IST)
मराठी भाषेच्या संवर्धनासाठी लोकसहभाग हवाच, असे प्रतिपादन मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी केले. मराठी भाषा मंत्री देसाई यांच्या अध्यक्षतेखाली मराठी भाषा विभागातंर्गत असलेल्या राज्य मराठी विकास संस्थेच्या नियामक मंडळाच्या नवनिर्वाचित सदस्यांची बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे झाली. मराठी भाषेचा प्रचार-प्रसार आणि संवर्धनाबाबत यावेळी सांगोपांग चर्चा करण्यात आली. यावेळी राज्यमंत्री डॉ.विश्वजीत कदम, भाषा विभागाचे अपर मुख्य सचिव भूषण गगराणी, साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, विश्वकोष निर्मिती मंडळाचे अध्यक्ष डॉ. राजा दीक्षित आदी उपस्थित होते.
 
राज्य मराठी विकास संस्थेच्या सदस्यांची ०३ नोव्हेंबर रोजी नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर आज सर्व सदस्यांची बैठक पार पडली. यावेळी श्री. देसाई म्हणाले की, मराठी भाषा विभागाने मागील दोन वर्षात अनेक चांगले उपक्रम राबविले. मराठी भाषेचे संवर्धन अधिक चांगल्या प्रकारे कसे करता येईल, यासाठी विशेष प्रयत्न केले. यामध्ये सर्व भाषांच्या शाळांमध्ये मराठीची सक्ती, दुकानांवरील मराठी भाषेतील पाट्यांचा कायदा केला. याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कामकाजात मराठीचा वापर प्रभावीपणे व्हावा, यासाठी देखील कायदा केला. आगामी काळात दैनंदिन कामकाजात मराठी भाषेचा वापर वाढविण्यासाठी सर्व नगरपालिका आणि महामंडळ प्राधिकरणात कार्यशाळा घेतली जाईल. याशिवाय दुकानांच्या पाट्यांचे निरीक्षण करण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन श्री.देसाई यांनी केले.
 
मराठीचे संवर्धन करणाऱ्यांना आपण जोडून घेतले पाहिजे. मुंबई आणि तंजावर या शहरातील सांस्कृतिक आणि भाषिक देवाण-घेवाण झाली पाहिजे. मराठी भाषा विभागाचे उपक्रम जगभरातील मराठी वाचकांपर्यंत पोहोचविण्यासाठी नियतकालिक प्रकाशित करण्यास सुरुवात करावी लागणार आहे. महाराष्ट्राच्या बाहेर राहणाऱ्यांना याद्वारे सर्व माहिती उपलब्ध होईल, असे श्री. देसाई यांनी स्पष्ट केले.

यावर्षी मराठी भाषा भवनचे स्वप्न पूर्ण होत आहे. गुढीपाडव्याला त्याचे भूमिपूजन झाले आहे. सर्वांना अभिमान वाटेल, असे भव्य भाषा भवन उभे राहणार आहे. मराठी भाषेचा प्राचीन, मध्यमयुगीन आणि स्वातंत्र्योत्तर काळातील मराठीचा प्रवास आदींचे दर्शन यातून घडणार आहे. त्यासाठी अभ्यासकांची समिती नियुक्ती केली जाणार आहे.यावेळी अच्युत गोडबोले, सुदेश भोसले, प्रशांत गिरबने, हेरंब कुलकर्णी, सिसिलिया कार्व्हालो, नमिता कीर, डॉ. गुरुनाथ पंडीत, रावसाहेब काळे आदींनी सूचना केल्या.
 
यावेळी राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक संजय पाटील यांनी सध्या राबवित असलेल्या व आगामी उपक्रमांची माहिती दिली. ते म्हणाले की, ज्ञानेश्वरी ग्रंथाचे ऑडिओ बुक तयार होत आहे. ११० तासांचे ऑडिओ बुक असेल. लवकरच त्याचा लोकार्पण सोहळा होईल. याशिवाय जगभरातील मराठी भाषिकांसाठी मराठीला जागतिक स्वरुप देण्याचा प्रयत्न केला जात आहे. सीमावर्ती भागातील मराठीचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी प्रयत्न करणे.

‘पाणिनी’ ग्रंथांचे मराठीकरण केले जाणार आहे. डॉ.गंगाधर पानतावणे यांच्या जीवनावर लघुपट तयार करण्यात येणार आहे. पुस्तकांचे गाव ही योजना राज्यभर राबविण्यात येणार आहे.आगामी काळात बाल विश्वकोशची निर्मिती करण्याचा विभागाचा मानस असल्याचे डॉ. राजा दीक्षित यांनी सांगितले.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

किरीट सोमय्या अडचणीत ; आर्थिक गुन्हे शाखेच्या टीमची त्यांच्या कार्यालय आणि निवासस्थानी धडक