Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Thursday, 10 April 2025
webdunia

औरंगाबाद : अल्पवयीन मुलानं क्राईम सीरीज पाहून केली प्राध्यापकाची हत्या

Aurangabad
, सोमवार, 18 ऑक्टोबर 2021 (21:07 IST)
औरंगाबादेतील प्राध्यापक डॉ. राजन शिंदे हत्या प्रकरणाचं गूढ उकलण्यात अखेर पोलिसांना यश मिळाल्याचं समोर आलं आहे. एका अल्पवयीन मुलानं ही हत्या केल्याचं समोर आल्यानं या प्रकरणानं नाट्यमय वळण घेतलं आहे.
 
मागच्या आठवड्यात रविवारी (10 ऑक्टोबर) मध्यरात्री राजन शिंदे यांची हत्या झाल्याचं समोर आलं होतं. रक्ताच्या थारोळ्यात त्यांचा मृतदेह घरातील सदस्यांना सकाळी आढळला होता, असं पोलिसांना त्यांनी सांगितलं होतं.
 
डॉ. राजन शिंदे हे एका खासगी महाविद्यालयात इंग्रजी विभागाचे विभागप्रमुख होते, तर त्यांच्या पत्नी मनिषा शिंदे या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या उस्मानाबाद उपकेंद्रामध्ये प्राध्यापिका आहेत.
पोलिसांनी जवळपास आठवडाभर तपास केल्यानंतर खूनाचा छडा लावला आहे. या मुलाचे डॉ. राजन शिंदे यांच्याबरोबर करिअरच्या मुद्द्यावरून वैचारिक मतभेद होते. त्या रागातूनच हत्या झाल्याचं तपासातून समोर आल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.
घटना घडण्याच्या आधीदेखीस अल्पवयीन मुलगा आणि मृत डॉ. राजन शिंदे यांच्यामध्ये भांडण झाल्याची माहिती मिळाली आहे. त्यावेळी मृत शिंदे यांनी मुलाला रागावलं होतं. त्या रागातून याबालकानं त्यांची हत्या केल्याचं पोलिसांनी सांगितलं.
 
पोलिस उपायुक्त दीपक गीऱ्हे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
 
या मुलाला पोलिसांनी आज (18 ऑक्टोबर) ताब्यात घेतलं. त्यानंतर त्यानं पोलिसांना कबुली दिली आणि नंतर त्यानं सांगितलेल्या माहितीनुसार हत्यारं आणि पुरावे टाकलेली जागा दाखवली, असं पोलिसांनी सांगितलं.
 
ही हत्या कट रचून केल्यांसंदर्भात माहिती मिळाली नाही, असं पोलिसांनी सांगितलं.
 
क्राईम बेव सिरीजच्या प्रभावाची शक्यता
हत्येच्या गुन्ह्यात सहभाग असेलल्या अल्पवयीन मुलानं हत्या करण्यासाठी कट रचल्याची माहिती मिळाली नसल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे.
 
मात्र, या मुलानं हत्या करण्यापूर्वी बरीच माहिती मिळवली, गुन्हेगारी विषयक चित्रपट, क्राईम कंटेंट पाहिला अशी माहिती असल्याचे पुरावे आहेत का, असं पोलिसांना विचारण्यात आलं.
 
त्यावर त्याची सर्च हिस्ट्री पाहता त्यानं क्राईम रिलेटेड बेव सिरीज पाहिल्याचं आढळून आलं आहे, असंही पोलिसांनी सांगितलं.
 
झोपेत मध्यरात्री अडीच ते तीनच्या सुमारास ही घटना घडल्याचं मुलानं पोलिसांना सांगितलं. मात्र, कुटुंबातील इतर कोणालाही या हत्येबाबतची माहिती नव्हती, असं तपासातून समोर आल्याचं पोलिसांनी सांगितलं.
 
 
सर्व शक्यता तपासल्याने वेळ लागला
खुनाच्या गुन्ह्यामध्ये तपास करताना सर्व शक्यता तपासाव्या लागतात. अशा सर्व शक्यता तपासण्यासाठी वेळ लागत असल्यानं, छडा लावण्यात उशीर झाला, असं पोलिस म्हणाले.
 
मुलगा अल्पवयीन असल्यानं अत्यंत काळजीपूर्वक तपास आणि चौकशी करावी लागल्याचंही पोलिसांनी सांगितलं.
 
घटनाक्रम
डॉ. राजन शिंदे यांची हत्या रविवारी मध्यरात्रीनंतर आणि सोमवारी पहाटेच्या दरम्यान झाल्याचं समोर आलं. सुरुवातीला या प्रकरणी त्यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांना माहिती दिली.
 
कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (10 ऑक्टोबर) रात्री राजन शिंदे हे रात्री अकराच्या सुमारास बाहेरून आल्यानंतर कुटुंबातील सगळे जण आपापल्या खोलीत झोपायला गेले होते. सगळे झोपायला गेले तेव्हा राजन शिंदे टीव्ही पाहत बसलेले होते, असं कुटुंबीयांनी सांगितलं.
 
त्यानंतर सकाळी पाच वाजता राजन शिंदे यांच्या मुलानं वडिलांना रक्ताच्या थारोळ्यात पडलेलं पाहिलं. त्यानंतर मुलगा बहिणीला सोबत घेऊन कारमधून रुग्णवाहिका आणण्यासाठी गेला.
 
ते रुग्णवाहिका घेऊन आले. मात्र रुग्णवाहिका चालकानं पोलिसांशी संपर्क साधण्यास सांगितलं. त्यानंतर या संदर्भात पोलिसांना माहिती देण्यात आली आणि तपासाला सुरुवात झाली.
 
पोलिस तपासात काय आढळलं?
पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी कसोशीने प्रयत्न सुरू केले. चौकशीत एका अल्पवयीन मुलाकडे संशयाची सुई फिरत होती.
 
मात्र पोलिसांना ठोस काहीही हाती लागत नव्हतं. तपासाचे धागेदोरे जुळवून पोलिस पुराव्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होते, पण पोलिसांना पुरावे हाती लागत नव्हते. पोलिसांनी मित्र परिवार आणि नातेवाईकांचीही चौकशी केली. मात्र त्यातूनही काही हाती लागलं नाही.
 
हत्या करून शिंदे यांचे कपडे आणि हत्येसाठी वापरलेल्या हत्यारांसह पुरावे नष्ट केल्याचा संशय पोलिसांना होता. त्यानुसार पोलिसांनी आसपाच्या परिसरात शोधाशोध केली.
 
डॉ. राजन शिंदे यांच्या घराजवळ असलेल्या विहिरीत हत्येसाठी वापरलेली शस्त्रं आणि इतर पुरावे शोधण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला. मात्र विहिरीमध्ये पाण्याबरोबरच प्रचंड कचरा आणि गॅस तयार झालेला होता, त्यामुळं तो तपासही पुढं सरकू शकला नाही.
 
विहिरीत पुरावे शोधण्यावर लक्ष केंद्रित
पोलिसांना जवळपास चार दिवस काहीही हाती लागलं नाही. त्यामुळं तांत्रिकदृष्ट्या वेगानं तपास सुरू करण्यात आला. त्यासाठी सायबर शाखेची मदत घेण्यात आली.
 
पोलिसांनी पुन्हा एकदा पुरावे शोधण्यासाठी शिंदे यांच्या घराजवळील विहिरीकडं मोर्चा वळवला.
 
विहिरीतील गाळ उपसून शस्त्राचा शोध घेण्यासाठी पाणी आणि गाळ उपसायला सुरुवात करण्यात आली. दरम्यान, इतर अंगांनी तपास सुरुच होता.
 
अखेर तपासादरम्यान शनिवारी (16 ऑक्टोबर) पोलिसांना महत्त्वाचे धागेदोरे आढळले आणि पोलीस जवळपास आरोपीपर्यंत पोहोचले होते, मात्र पुराव्याअभावी सर्वकाही खोळंबलं होतं.
 
रविवारीही दिवसभर विहिरीतील गाळ काढणं सुरू होतं. अखेर सोमवारी सकाळी पोलिसांना या हत्या प्रकरणी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतलं. त्यानं हत्या केल्याची कबुली दिली. तसंच विहिरीतून हत्येसाठी वापरण्यात आलेली हत्यारं आणि ती गुंडाळून फेकलेला टॉवेल असे पुरावे सापडले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

दिवाळी आधी कोरोना निर्बंध शिथिल होणार