Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नवाब मलिक यांना जामीन: 'भंगारवाला' ते मंत्री असा आहे राजकीय प्रवास

nawab malik
, शुक्रवार, 11 ऑगस्ट 2023 (16:19 IST)
Bail for Nawab Malik : महाराष्ट्राचे माजी मंत्री नवाब मलिक यांना सर्वोच्च न्यायालयाने 2 महिन्यांसाठी जामीन मंजूर केला आहे.
नवाब मलिक यांना ईडीने अटक केली होती आठ तासांच्या प्रदीर्घ चौकशीनंतर त्यांना अटक करण्यात आली होती.
वैद्यकीय तपासणीनंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. त्यांच्यावतीने वकील युक्तिवाद करत आहेत. कॅबिनेट मंत्री असलेल्या मलिक यांच्या अटकेनंतर महाविकास आघाडी सरकार आणि भाजप हा संघर्ष तीव्र झाला होता
 
दरम्यान मलिक यांच्या अटकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांची बैठक बोलावण्यात आली आहोती. राष्ट्रवादी काँग्रेसचे समर्थक ईडी कार्यालयाबाहेर आणि नंतर न्यायालयाबाहेर जमले आहोते. याठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहोता.
 
नवाब मलिक यांच्या राजकीय कारकीर्दीचा यानिमित्ताने घेतलेला आढावा.
 
लोकसभा निवडणूक 1984. ईशान्य मुंबई मतदारसंघात काँग्रेसचे गुरुदास कामत आणि भाजपचे प्रमोद महाजन या दोन दिग्गजांची काँटे की टक्कर सुरू होती.
 
गुरुदास कामत यांना या निवडणुकीत 2 लाख 73 हजारांपेक्षा जास्त मतं मिळाली. सुमारे 95 हजार मताधिक्क्याने ते विजयी झाले.
 
याच निवडणुकीत एक 25 वर्षांचा एक तरुणही नशीब आजमावत होता. कामत यांच्या विरोधात त्याला कशीबशी फक्त 2620 मतं मिळवता आली.
 
पण तेव्हाचा हा पराभूत उमेदवार गेल्या काही दिवसांपासून राज्याचं राजकारण गाजवतोय. त्याचं नाव आहे नवाब मलिक.
 
विद्यमान महाराष्ट्र सरकारमध्ये नवाब मलिक यांच्याकडे अल्पसंख्याक, उद्योजकता आणि कौशल्य विकास खात्याचं कॅबिनेट मंत्रिपद आहे. यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं मुख्य राष्ट्रीय प्रवक्तेपद तसंच मुंबई शहराध्यक्षपदही ते सांभाळतात.
 
शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला ड्रग्ज प्रकरणात अटक झाल्यापासून नवाब मलिक सक्रिय झाल्याचं दिसून आलं.
 
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) मुंबईचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर ते सातत्याने निशाणा साधत होते.
 
नवाब मलिक आता ईडीच्या रडारवर आले आहेत. जुन्या मालमत्ता व्यवहार प्रकरणी नवाब मलिक यांची अंमलबजावणी संचालनालय (ईडी)कडून आज (23 फेब्रुवारी) चौकशी केली जात असल्याची माहिती समोर आली आहे.
 
पहाटेच ईडीचं पथक नवाब मलिक यांच्या घरी दाखल झालं होतं. त्यानंतर नवाब मलिक यांची ईडी कार्यालयात अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू आहे.
 
या सर्व घडामोडींच्या निमित्ताने बीबीसी मराठीने नवाब मलिक यांच्या आजपर्यंतच्या राजकीय प्रवासाचा आढावा घेतला.
 
मूळचं उत्तर प्रदेशचं मलिक कुटुंब
नवाब मलिक यांचं कुटुंब मूळचं उत्तर प्रदेशचं. तिथं त्यांची शेती आणि इतर व्यवसाय होते. आर्थिक स्थितीही ठिकठाक होती.
 
नवाब यांचे वडील मोहम्मद इस्लाम मलिक हे त्यांच्या जन्मापूर्वीच मुंबईत स्थायिक झाले.
 
पण पहिल्या अपत्याच्या बाळंतपणासाठी म्हणून ते पुन्हा उत्तर प्रदेशात गेले. आईच्या माहेरी म्हणजेच उत्तर प्रदेशातील बलरामपूर जिल्ह्यातील उतरौला तालुक्यात दुसवा गावात 20 जून 1959 ला नवाब यांचा जन्म झाला.
 
त्यानंतर मलिक कुटुंब पुन्हा मुंबईला परतलं.
 
मुंबईत मलिक कुटुंबांचे लहान-मोठे व्यवसाय होते. त्यांच्या मालकीचं एक हॉटेल होतं. त्याव्यतिरिक्त भंगार व्यवसाय आणि इतर काही कामं ते करायचे.
 
"होय मी भंगारवाला आहे. माझ्या वडिलांनी मुंबईत कपडे आणि भंगाराचा व्यवसाय केला. मीही आमदार होईपर्यंत भंगाराचा व्यवसाय केला. माझे कुटुंबीय आजही करतात. मला त्याचा अभिमान आहे," असं भाजपच्या एका टीकेला उत्तर देताना मलिक म्हणालेत.
 
ते पुढे म्हणाले, "होय मी भंगारवाला आहे. पण, भंगारवाल्याची किमयागिरी काय असते, ते या लोकांना माहिती नाही. जी वस्तू उपयोगी नसते, तो ती उचलून आणतो. त्याचे एकएक तुकडे करतो आणि शेवटी भट्टीत टाकतो आणि पाणीपाणी करण्याचं काम भंगारवाला करतो. नवाब मलिक या शहरात जिकते भंगार आहेत, त्या सगळ्यांचे एकएक नटबोल्ट खोलून भट्टी टाकणार आहे. यांचं पाणीपाणी केल्याशिवाय नवाब मलिक भंगारवाला थांबणार नाही."
 
मुंबईत दाखल झाल्यानंतर सुरुवातीपासूनच मलिक कुटुंब डोंगरी परिसरात वास्तव्याला होतं.
 
वयाच्या एकविसाव्या वर्षी 1980 साली नवाब यांचा विवाह मेहजबीन यांच्याशी झाला. त्यांना फराज, आमीर ही दोन मुलं तर निलोफर आणि सना या दोन मुली आहेत.
 
सामाजिक विरोधामुळे सोडली इंग्रजी शाळा
हिमांशी प्रोडक्शनला दिलेल्या मुलाखतीत, नवाब मलिक यांनी आपल्या आयुष्यातील अनेक गोष्टी उलगडून सांगितल्या आहेत.
 
सुरुवातीला नवाब यांचं प्राथमिक शाळेतलं अॅडमिशन सेंट जोसेफ या इंग्रजी शाळेत करण्यात आलं होतं. पण त्याला वडील मोहम्मद इस्लाम यांचे नातेवाईक आणि मित्रमंडळींचा विरोध झाल्यामुळे त्यांनी ते रद्द केलं.
पुढे महापालिकेच्या नूरबाग उर्दू शाळेत नवाब यांना दाखल करण्यात आलं. इथूनच त्यांनी चौथ्या इयत्तेपर्यंत शिक्षण घेतलं. त्यानंतर डोंगरीच्या जीआर नंबर 2 शाळेत सातवीपर्यंत आणि CST परिसरातील अंजुमन इस्लाम शाळेत अकरावीपर्यंतचं (तत्कालीन मॅट्रीक) शिक्षण त्यांनी घेतलं.
 
मॅट्रीक पूर्ण झाल्यानंतर त्यांनी बुऱ्हाणी कॉलेजमधून बारावी पूर्ण केलं. तसंच त्याच कॉलेजमध्ये बीएसाठी अॅडमिशन घेतलं. पण कौटुंबिक कारणामुळे त्यांनी बीएची अंतिम वर्षाची परीक्षा दिली नाही.
 
विद्यार्थी आंदोलनामुळे राजकारणात रस
दरम्यान, नवाब मलिक महाविद्यालयात शिक्षण घेत असताना मुंबई विद्यापीठाने महाविद्यालयीन फी वाढवली होती. त्याचा विरोध करण्यासाठी शहरात एक आंदोलन झालं. त्या आंदोलनामध्ये नवाब मलिक यांनी एका सर्वसामान्य विद्यार्थ्याप्रमाणेच सहभाग नोंदवला होता.
या आंदोलनादरम्यान पोलिसांकडून लाठीमार झाला होता. त्यात नवाब जखमी झाले. दुसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांनी पोलीस आयुक्तालयावरही मोर्चा काढला होता. तिथंही ते गेले. याच कालावधीत आपल्याला राजकारणात रस निर्माण झाल्याचं नवाब मलिक सांगतात.
 
ते पुढे सांगतात, "1977 साली केंद्रात जनता पक्षाचं सरकार आलं. पुढे तरुणांमध्ये या सरकारच्या विरोधात वातावरण निर्माण झालं होतं. त्यामुळे अधून-मधून काँग्रेसकडून आयोजित लहान-मोठ्या बैठकांमध्ये मी सहभागी होऊ लागलो. पण त्यावेळी विशेष काही सक्रिय नव्हतो. व्यवसाय सांभाळून राजकीय-सामाजिक काम सुरू होतं."
 
1984 ची लोकसभा निवडणूक
1980 दरम्यान काँग्रेस नेते संजय गांधी यांचं अपघाती निधन झालं, त्यानंतर काही दिवसांनी त्यांच्या पत्नी मनेका यांनी संजय विचार मंच नावाने वेगळा गट स्थापन केला होता. त्यावेळी त्यांच्याशीही ते जोडले गेले होते.
 
त्यावेळी झालेल्या लोकसभा निवडणुकीत नवाब मलिक यांनी संजय विचार मंचकडून निवडणूक लढवली. पण त्याला राजकीय पक्षाचा दर्जा प्राप्त नसल्याने अपक्ष म्हणूनच ही निवडणूक ग्राह्य धरली जाते.
 
वर नमूद केल्याप्रमाणे मलिक त्यावेळी फक्त 25 वर्षांचे होते. त्यांना या निवडणुकीत फक्त 2620 मतं मिळाली.
 
याबाबत ते सांगतात, "नाममात्र मतं मिळून मी पराभूत झालो. त्यावेळी राजकारणात अपरिपक्व असल्याने आपण तो निर्णय घेतला होता. परंतु, या सर्व घटनाक्रमामुळे राजकारणात काम करायचं असेल, तर काँग्रेस पक्षाशिवाय कोणताच पर्याय नाही, याची खात्री मला पटली."
 
पुढे नवाब मलिक पुन्हा काँग्रेसचं काम करू लागले. त्यांनी 1991 साली काँग्रेसकडून महापालिका निवडणुकीचं तिकीट मागितलं. पण काँग्रेसने त्यांना तिकीट नाकारलं.
 
पण नवाब मलिक यांची राजकीय खटाटोप पुढेही सुरूच होती.
 
'पत्रकार मलिक'
डिसेंबर 1992 ला बाबरी प्रकरणानंतर मुंबईत दंगली घडल्या. त्यानंतर सर्वत्र संवेदनशील वातावरण होतं. त्यावेळी आपणही एखादं वृत्तपत्र सुरू करावं, असा विचार नवाब मलिक यांच्या मनात आला.
 
त्याच्या काही वर्षांपूर्वीच शिवसेनेचं सामना हे वृत्तपत्र सुरू होऊन मुंबईत लोकप्रियही झालं होतं. त्याचप्रमाणे आपणही एक वृत्तपत्र सुरू करू, असा निर्णय मलिक आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घेतला.
 
त्यानुसार, मलिक यांनी नीरज कुमार यांच्यासमवेत मिळून सांज समाचार नावाचं वृत्तपत्र मुंबईत सुरू केलं. पण काही वर्षांनी आर्थिक अडचणींमुळे सांज समाचार बंद पडलं.
 
समाजवादी पक्ष, पोटनिवडणूक आणि विधानसभेची लॉटरी
बाबरी प्रकरणानंतर मुस्लीम मतदारांमध्ये समाजवादी पक्ष लोकप्रिय होऊ लागला होता. याच लाटेत नवाब मलिक यांनीही समाजवादी पक्षात प्रवेश केला.
 
1995 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना मुस्लीम बहुल मानल्या जाणाऱ्या नेहरूनगर मतदारसंघाचं तिकीट पक्षाकडून मिळालं.
 
त्यावेळी शिवसेनेचे सूर्यकांत महाडिक यांनी 51 हजार 569 मते मिळवून विजय प्राप्त केला. तर दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या मलिक यांना 37 हजार 511 मते मिळाली.
 
मलिक पराभूत झाले, पण पुढच्याच वर्षी या मतदारसंघात पुन्हा निवडणूक लागली.
 
आमदार महाडिक यांनी धर्माच्या आधारावर मतं मागितल्याच्या प्रकरणात त्यांच्याविरोधात दाखल याचिकेवर सुनावणी सुरू होती. यात ते दोषी आढळल्याने निवडणूक आयोगाने ही निवडणूक रद्द ठरवली. त्यामुळे नेहरू नगर मतदारसंघात 1996 साली पुन्हा निवडणूक लागली.
 
यावेळी मात्र नवाब मलिक यांनी सुमारे साडेसहा हजारांच्या फरकाने विजय मिळवला.
 
'राष्ट्रवादी काँग्रेसचा मुस्लीम चेहरा'
1999 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत नवाब मलिक यांनी समाजवादी पक्षाकडून पुन्हा विजय मिळवला.
 
यावेळी काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांचं आघाडी सरकार सत्तेत आलं.
 
समाजवादी पक्षाकडून दोन आमदार निवडून आले होते. आघाडीला पाठिंबा दिल्यामुळे त्यांनाही सत्तेत वाटा देण्यात आला.
 
सत्ता समीकरणात नवाब मलिक यांची गृहनिर्माण राज्यमंत्रीपदी वर्णी लागली. त्यांचा कारभार योग्यरित्या सुरू होता. पण याच काळात मलिक यांचे समाजवादी पक्षातील नेत्यांशी असलेले मतभेद चव्हाट्यावर आले. त्याला कंटाळून अखेर मलिक यांनी मंत्रिपदावर असतानाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.
 
पक्ष सोडण्याच्या आपल्या निर्णयाबाबत ते सांगतात, "त्यावेळी समाजवादी पक्षातील मुंबईचे नेते धार्मिक आधारावर राजकारण करण्याचा प्रयत्न करत होते. समाजवादी पक्ष एखादा मुस्लीम लीग असल्याप्रमाणे त्यांचा कारभार होता. त्यांच्याशी न पटल्यामुळे 2001 मध्ये पक्ष सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला."
 
पुढे राष्ट्रवादी काँग्रेसकडून मलिक यांनी उच्च आणि तंत्रशिक्षण, कामगार मंत्रालय या खात्यांचं मंत्रिपद सांभाळलं.
 
ज्येष्ठ राजकीय विश्लेषक हेमंत देसाई मलिक यांच्याबाबत सांगतात, "महाराष्ट्राच्या राजकारणात मोजकेच मुस्लीम चेहरे पुढे आले. त्यामध्ये नवाब मलिक यांचं नाव आघाडीवर आहे. सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेसचा मुस्लीम चेहरा म्हणूनच मलिक यांना पक्षात स्थान देण्यात आलं होतं."
 
अण्णा हजारेंच्या आरोपांनंतर दिला होता राजीनामा
2005-06 दरम्यान मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या सरकारमध्ये मंत्री असलेल्या नवाब मलिकांवर आपल्या पदाचा राजीनामा देण्याची वेळ आली होती.
 
माहीमच्या जरीवाला चाळ पुनर्विकास प्रकल्पात गैरव्यवहार झाल्याच्या प्रकरणात मलिक यांच्यावर अनेक आरोप करण्यात आले होते.
 
सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनीही या प्रकरणात एन्ट्री घेतली. त्यानंतर याबाबत चौकशी सुरू झाली आणि नवाब मलिक यांना राजीनामा द्यावा लागला. पुढे याच प्रकरणात सुप्रीम कोर्टाने 12 वर्षांनी निर्णय दिला. तत्कालीन राज्यमंत्र्यांनी घेतलेला निर्णय उचित असल्याचं कोर्टाने म्हटलं.
 
दरम्यान, हे प्रकरण शांत झाल्यानंतर नवाब मलिक यांना पुन्हा 2008 मध्ये मंत्रिपदावर घेण्यात आलं होतं.
 
जावयावरील कारवाईमुळेच सुडबुद्धीने बदला घेत असल्याचा आरोप
आर्यन खान ड्रग्ज प्रकरण समोर आल्यानंतर त्याचा सर्वाधिक आक्रमक विरोध नवाब मलिक यांच्याकडूनच झाला.
 
पण जावयावर केलेल्या कारवाईमुळेच नवाब मलिक अशा प्रकारे NCBवर सुडबुद्धीने आरोप करत असल्याची टीका भारतीय जनता पक्षाकडून करण्यात आली.
 
NCBला 9 जानेवारी 2021 ला काही संशयास्पद हालचालींचा सुगावा लागला होता.
 
समीर वानखेडेंच्या नावाने प्रसिद्ध करण्यात आलेल्या या पत्रकामध्ये "मुंबईतील वांद्रे भागातून गांजा जप्त केल्याचा दावा करण्यात आला होता."
 
यात आरोपी करण सजलानीच्या घरातून गांजाचा इंपोर्टेड प्रकार जप्त केल्याची माहिती दिली होती. चार आरोपींना या प्रकरणी अटक करण्यात आली. यानंतर सर्वांत पहिल्यांदा नवाब मलिक यांचा जावई समीर खान यांचं नाव पुढे आलं.
 
समीर खान हे मलिक यांनी ज्येष्ठ कन्या निलोफर यांचे पती आहेत.
 
एनसीबीने NDPS कायद्याच्या कलम 27 (A) अंतर्गत समीर खान यांना ड्रग्जची तस्करी आणि पैसे पुरवल्याच्या आरोपाप्रकरणी जानेवारी महिन्यात अटक केली होती.
 
या प्रकरणात सेशन्स कोर्टाने समीर खान यांना 14 ऑक्टोबर रोजी जामीन दिला आहे.
 
समीर खान यांच्यावरील ड्रग्जची तस्करी आणि ड्रग्जसाठी पैसा पुरवण्याचे आरोप टिकत नसल्याचं कोर्टाने जामीन मंजूर करताना नमूद केलं आहे.
 
कोर्टाच्या आदेशानंतर नवाब मलिक यांनी, "एनसीबी लोकांना खोट्या गुन्ह्यात गुंतवून नाहक बदनाम करण्याचं काम करते, 200 किलो गांजा मिळाला, असं NCB ने म्हटलं, पण हा हर्बल तंबाखू असल्याचं रिपोर्टमध्ये स्पष्ट झालं," असा आरोप केला.
 
नवाब मलिक यांच्या आरोपांवर नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नव्हती.
 








Published By- Priya Dixit
 
 
 
 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Khataav Accident : देवदर्शनाला जाताना अपघातात चौघांचा जागीच दुर्देवी मृत्यू