Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बाळासाहेबांची शपथ, आम्ही खोटं बोलणार नाही: संजय राऊत

बाळासाहेबांची शपथ, आम्ही खोटं बोलणार नाही: संजय राऊत
, गुरूवार, 14 नोव्हेंबर 2019 (15:53 IST)
‘भाजप-शिवसेना युतीमध्ये झालेली चर्चा ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या खोलीत झाली होती. भाजपसाठी ती बंद दाराआडची चर्चा असेल. पण आमच्यासाठी ती सामान्य खोली नाही, मंदिर आहे. मंदिरात झालेली चर्चा कोणी नाकारत असेल तर तो बाळासाहेबांचा, महाराष्ट्राचा अपमान आहे. बाळासाहेबांची शपथ घेऊन आम्ही खोटं बोलणार नाही,’ असा घणाघात शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज केला. 
 
लीलावती रूग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर संजय राऊत यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेद्वारे पुन्हा एकदा शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्यावर निशाणा साधला. शिवसेना आणि भाजपामध्ये बंद दरवाजाआड  जी काही बोलणी झाली, ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना का सांगितली नाही, असा सवाल त्यांनी यावेळी केला. 
 
निवडणुकीदरम्यान आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर मतं मागितली. त्यामुळे निवडणुकीदरम्यान ठरवलेल्या गोष्टी त्यांना कळणं अपेक्षित होतं. आमचा त्यांच्याप्रती आदर आहे. बंद खोलीत ज्या गोष्टी ठरतात, त्यावर जेव्हा अंमल होत नाही त्यावेळी त्या बाहेर येतात, असं राऊत म्हणाले. 
 
तसंच ज्या खोलीत बसून बाळासाहेबांनी हिंदुत्वाचा संदेश दिला, ज्या खोलीत बाळासाहेब बसत असत त्या खोलीत दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये चर्चा झाली. ती खोली म्हणजे आम्हाला मंदिरासमान आहे. या खोलीत झालेल्या गोष्टी खोट्या आहेत असं जर कोणी म्हणत असेल तर तो बाळासाहेबांचा आणि संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान असल्याचं त्यांनी सांगितलं. 
 
समान सत्तावाटपाच्या मुद्द्यावरून भाजप-शिवसेनेत आलेल्या दुराव्यावर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी बुधवारी प्रथमच भाष्य केलं होतं. ‘आमच्या महायुतीला निवडणुकीत यश मिळालं तर देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री असतील असं मोदींनी सार्वजनिक व्यासपीठावर अनेक वेळा सांगितलं होतं. त्याचवेळी शिवसेनेनं विरोध का केला नाही. आता ते नवी मागणी करू लागले, ती आम्ही मान्य करू शकत नाही,’ असं शहा म्हणाले होते. बंद दाराआड झालेल्या गोष्टी शिवसेनेनं चव्हाट्यावर आणल्याचा आरोपही शहा यांनी केला होता.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

रफाल खटल्यातील सर्व पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळल्या