समान कार्यक्रम ठरविण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीची 5-5 जणांची समिती बनणार

बुधवार, 13 नोव्हेंबर 2019 (15:56 IST)
सत्ता स्थापनेसाठी पुन्हा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची काँग्रेस नेत्यांसोबत बैठक झाली. या बैठकीनंतर उद्धव ठाकरेंनी चर्चा योग्य दिशेने सुरु आहे. निर्णय लवकरच कळेल, असे सांगितले. जवळपास 55 मिनिटे चाललेल्या या बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली. 
 
शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जाऊन राज्यात सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासंबंधी चर्चा तिन्ही पक्षात चर्चा सुरू आहे. बुधवारी उद्धव ठाकरे यांची काँग्रेस नेत्यांसोबत वांद्रे येथील हॉटेल ट्रायडंटमध्ये बैठक झाली.
 
याआधी सत्तास्थापनेच्या चर्चेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची महत्वपूर्ण बैठक यशवंतराव चव्हाण सेंटर येथे पार पडली. आमच्या दोन पक्षात एकवाक्यता झाल्यानंतर शिवसेनेसोबत चर्चा करणार आहे अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ नेते अजित पवार यांनी दिली आहे. 
 
याचबरोबर, या बैठकीत समान कार्यक्रम ठरविण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीची 5-5 जणांची समिती तयार करण्यात आली आहे. या समितीत राष्ट्रवादीकडून जयंत पाटील, अजितदादा पवार, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, नवाब मलिक यांची नावे आहेत. तर काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, विजय वडेट्टावार, माणिकराव ठाकरे समितीत असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

वेबदुनिया वर वाचा

पुढील लेख चौहान यांची ट्विटरवरुन शिवसेनेवर टीका