देशातील पाच राज्यांमध्ये निवडणूक होत असून त्यात उत्तर प्रदेश हे सर्वात मोठे राज्य आहे. उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाबरोबर हातमिळवणी करुन निवडणूक लढविण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतला आहे. याच निवडणुकीत आता राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी एण्ट्री केली आहे.
उत्तर प्रदेश मधील इतर मागासवर्गीय (ओबीसी) नेते आणि जन अधिकार पार्टीचे अध्यक्ष बाबूसिंह कुशवाह यांनी आज अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांची मुंबई येथे भेट घेतली. उत्तर प्रदेश येथे होत असलेल्या विधानसभा निवडणुकीसंदर्भात उभयतांमध्ये चर्चा झाली. उत्तर प्रदेशच्या निवडणुकीमध्ये ओबीसी मते ही निर्णायक ठरणार असल्याचे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले. दोन्ही नेत्यांमध्ये ओबीसी मते आकर्षित करण्याबाबत चर्चा झाली आहे.
उत्तर प्रदेशमध्ये सत्ताधारी भाजपला शह देण्यासाठी काँग्रेस, समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष यासह अन्य पक्षांनी जोरदार तयारी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनेही पक्ष विस्तारासाठी काही नेत्यांवर लक्ष केंद्रित केले आहे. त्यादृष्टीने भुजबळ आणि कुशवाह यांची भेट महत्त्वाची मानली जात आहे.