Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अभिषेक घोसाळकर हत्येप्रकरणी मोठी बातमी, मुंबई हायकोर्टाचे 'हे' महत्त्वाचे निर्देश

FACEBOOK
, मंगळवार, 23 एप्रिल 2024 (20:59 IST)
शिवसेना नेते विनोद घोसाळकर यांचे पुत्र अभिषेक घोसाळकर यांची काही दिवसांपूर्वी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणात आता घोसाळकर कुटुंबीयांनी मुंबई पोलिसांच्या तपासाबाबत गंभीर आरोप केले आहेत. मुंबई पोलीस या हत्याप्रकरणाच्या तपासात खूप घाई करत आहेत. पोलिसांनी घाईघाईतच न्यायालयात आरोपपत्र दाखल केल्याचे घोसाळकर कुटुंबीयांचे म्हणणे आहे. गुन्ह्याची नोंद झाल्यानंतर न्यायालयात आरोपपत्र सादर करण्यासाठी 90 दिवसांची मुदत असते.
 
मात्र, मुंबई पोलिसांनी केवळ 60 दिवसांतच तपास आटोपून आरोपपत्र दाखल केले. मूळ तक्रारदार असलेल्या अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी तेजस्विनी घोसाळकर यांचे म्हणणे मुंबई पोलिसांनी नीट ऐकून घेतले नाही, असेही घोसाळकर कुटुंबीयांकडून उच्च न्यायालयात सांगण्यात आले.
 
घोसाळकर कुटुंबीयांच्या आरोपानंतर मुंबई उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निरीक्षणे नोंदवत सखोल तपासाचे निर्देश दिले.अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येचा सर्व बाजूंनी तपास करणे आवश्यक आहे. त्यासाठी  घटनेशी संबंधित सीसीटीव्ही फुटेज आणि सीडीआर ताब्यात घेत सखोल चौकशी करावी, असे न्यायालयाकडून सांगण्यात आले. याप्रकरणाची पुढील सुनावणी 6 मे रोजी होईल.
 
अभिषेक घोसाळकर हत्याप्रकरणात नेमकं काय घडलं?
अभिषेक घोसाळकर हे 8 फेब्रुवारी 2024 रोजी मॉरिस नरोन्हा नावाच्या व्यक्तीने गोळ्या झाडून हत्या केली होती. मॉरिसभाईने अभिषेक घोसाळकर यांना त्याच्या दहिसर येथील कार्यालयात साडीवाटपाच्या कार्यक्रमासाठी बोलावले होते. या कार्यक्रमापूर्वी दोघांनी मिळून एक फेसबुक लाईव्ह केले होते. या फेसबुक लाईव्हमध्ये अभिषेक घोसाळकर यांनी मॉरिसशी असलेले सर्व जुने वाद संपुष्टात आल्याची घोषणा केली होती.
 
यानंतर काहीवेळातच मॉरिसने एका पिस्तुलातून अभिषेक घोसाळकर यांच्यावर अगदी जवळून गोळ्या झाडल्या होत्या. त्यानंतर मॉरिसने स्वत:वरही गोळ्या झाडून आत्महत्या केली होती. अभिषेक घोसाळकर यांना त्यांच्या कार्यकर्त्यांनी नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी नेले होते. परंतु, तोपर्यंत अभिषेक घोसाळकर यांचा मृत्यू झाला होता. अभिषेक घोसाळकर हे शिवसेनेचे माजी नगरसेवक होते. त्यामुळे या घटनेने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती.

Edited by -Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नाशिक : वणीच्या यात्रेत सुमारे 2000 किलो भेसळयुक्त पेढा जप्त; एफडीएची कारवाई