Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या बिर्‍हाड मोर्चाला सुरुवात

hallabol-andolan-swabhimani
, सोमवार, 16 जानेवारी 2023 (14:54 IST)
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वसुलीसंदर्भात स्वाभिमान शेतकरी संघटनेच्या वतीने पालकमंत्री दादा भुसे यांच्या निवासस्थानी बिर्‍हाड मोर्चाला सकाळी सुरुवात झाली असून, हा मोर्चा थांबविण्यासाठी वेगवेगळ्या स्तरांवर प्रयत्न करण्यात आले होते; परंतु ते सर्व प्रयत्न अपयशी झाले.
 
नाशिक जिल्हा बँकेने ६२ हजार शेतकर्‍यांची जमीन लिलाव प्रक्रिया सुरू केली आहे. घेतलेल्या मुद्दलापेक्षा अनेक पटींनी व्याज लावल्यामुळे शेतकर्‍यांच्या जमिनीच्या किमतीपेक्षा कर्ज अधिक झाले आहे. नाशिक जिल्ह्यातील साधारण ६५ हजार शेतकरी भूमिहीन होण्याच्या मार्गावर आहेत. नाशिक जिल्ह्यात याविरुद्ध मोठा आक्रोश आहे. सरकारने नाशिक जिल्हा बँकेला राष्ट्रीयीकृत बँकेप्रमाणे ओटीएस करण्याचा आदेश द्यावा व त्यासाठी योग्य तो हस्तक्षेप करावा, ६२ हजार शेतकर्‍यांच्या जमिनी वाचवाव्यात यासह विविध मागण्याांसाठी हा मोर्चा काढण्यात येत आहे. या मोर्चाला आज सकाळी सप्‍तशृंगगडापासून सुरुवात झाली आहे.
 
या मोर्चामध्ये सुमारे एक हजारपेक्षा अधिक शेतकरी सहभागी झाले असून, या मोर्चाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी उपस्थित असून, तेदेखील या मोर्चात सहभागी झालेले आहेत. हा बिर्‍हाड मोर्चा पालकमंत्री दादा भुसे यांच्या मालेगाव येथील निवासस्थानासमोर जाऊन धडकणार आहे. आज सायंहकाळपर्यंत हा मोर्चा तेथे पोहोचेल, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सांगण्यात आले आहे. या बिर्‍हाड मोर्चात कृती समितीचे मार्गदर्शक स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप, सदस्य गंगाधर निखाडे, प्रशांत कड, संतोष रेहरे, बाबा कावळे, बापूसाहेब महाले आदींसह शेतकरी सहभागी झाले आहेत.
बैठक अपयशी
 
हा मोर्चा काढण्यात येऊ नये म्हणून पालकमंत्री दादा भुसे यांनी काल नाशिकमध्ये येऊन शासकीय विश्रामगृह येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांसह पदाधिकारी व प्रशासकीय अधिकार्‍यांशी चर्चा केली; परंतु याबाबत योग्य तो तोडगा न निघाल्याने ही बैठक अपयशी ठरल्यामुळे हा मोर्चा अखेर सुरू झाला आहे.
 
आज नाशिक जिल्ह्यातील ६२ हजार शेतकरी भूमिहीन होत असताना या शेतकर्‍यांना न्याय मागायचा असेल, तर जिल्ह्यातील पालकत्वाची जबाबदारी ज्यांच्यावर आहे ते पालकमंत्री दादा भुसे हेच शेतकर्‍यांना न्याय देऊ शकतात. म्हणून हे आंदोलन आम्ही त्यांच्या घरासमोर करीत आहोत. या संपूर्ण शेतकर्‍यांच्या पालकत्वाची जबाबदारी त्यांची आहे व ते ती पार पाडतील, अशी अपेक्षा आहे, अशी प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी दिली.
 
Edited By - Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मुंबई थंडी वाढली! कमी तापमानाची नोंद