Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

वाहनावर अशोकस्तंभ सोबत आमदारांचे कोरे लेटरहेड- पोलिसांच्या ताब्यात राहुल आहेर

वाहनावर अशोकस्तंभ सोबत आमदारांचे कोरे लेटरहेड- पोलिसांच्या ताब्यात राहुल आहेर
, मंगळवार, 31 ऑगस्ट 2021 (08:23 IST)
चारचाकी वाहनावर पुढे व मागे अशोक स्तंभासह विधानसभेचे स्टीकर लावून आपण लोकसेवक असल्याचा भास निर्माण करणा-या तसेच आमदारांच्या सहीचे कोरे लेटरहेड बाळगणा-यास नाशिक ग्रामीण पोलिसांच्या पथकाने अटक केली आहे.नाशिक ग्रामीण पोलिस अधिक्षक सचिन पाटील यांना मिळालेल्या माहीतीप्रमाणे सदर कारवाई 29 ऑगस्टच्या मध्यरात्री एक वाजता करण्यात आली.वणी पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या शिंदवड गावाच्या त्रिफुलीवर करण्यात आलेल्या कारवाईत राहुल दिलीपराव आहेर (32) रा.शिंदाड ता. दिंडोरी जि. नाशिक यास अटक करण्यात आली आहे.
 
राहुल आहेर या तरुणाच्या ताब्यात मिळालेल्या सिल्व्हर रंगाच्या इनोव्हा गाडीच्या (एमएच 15 डीएम 4175) पुढील व मागील बाजूस असलेल्या काचेवर गोलाकार हिरव्या व सिल्व्हर रंगाचे सत्यमेव जयते लिहिलेल्या व अशोकस्तंभाच्या चित्राचे स्टीकर लावलेले आढळून आले. याशिवाय केवळ अधिवेशन कालावधीसाठी वाहन प्रवेश पास नावाच्या लोगोचे देखील स्टीकर आढळून आले.

सदर वाहन शासकीय असल्याचे भासवण्याचा प्रयत्न असल्याचे एकंदरीत तपासणीत आढळून आले. तसेच नरहरी झिरवाळ, विधानसभा सदस्य यांच्या नावाचे राजमुद्रा असलेले सही असलेले कोरे नोटपॅड देखील त्याच्या कब्जात आढळून आले. याशिवाय माजी आमदार अनिल कदम यांचे विधानसभा सदस्यांचे ओळखपत्र, त्यांचा फोटो असलेले व स्वताचे महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय प्रवेश पत्रिका पोलिस पथकाला आढळून आले. या सर्व कागदपत्रांचा व वाहनाचा गैरवापर करुन विधानभवनात आमदार शिक्षणमंत्री व इतर मंत्र्यांसोबत आपले जवळचे संबंध असल्याचे भासवण्याचा राहुल आहेर याचा प्रयत्न असल्याचे दिसून आले. लोकांच्या शाळा अनुदानीत करुन देण्याच्या भुलथापा देत त्यांच्याकडून दिड लाख रुपये घेत खोटे कागदपत्र मिळून आल्यामुळे राहुल आहेर याच्याविरुद्ध वणी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
वणी पोलीस स्टेशनला सदर गुन्हा भा.द.वि. 171, 171 अ, 420, 468, 469 सह राजमुद्रा प्रति कायदा कलम 7 प्रमाणे दाखल करण्यात आला आहे. राहुल आहेर यास अटक करण्यात आली असून त्याला न्यायालयात हजर करण्यात आले.न्यायालयाने त्याला 3 सप्टेबर पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.नाशिक ग्रामीण पोलिस अधिक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वणी पोलिस स्टेशनचे स.पो.नि. स्वप्निल राजपुत यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे स.पो.नि. गुरळे, सहायक फौजदार पाटील,हवालदार वराडे,सानप,पोलिस नाईक जगताप, खराटे,मासुळे, पो.कॉ. बहिरम यांनी या कारवाईत सहभाग घेतला.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

लूटमार करणारे ठाकरे सरकारचे ११ महाभाग; किरीट सोमैय्या यांनी जाहीर केली यादी