पुणे- कोणतेही शारीरिक व्यंग असले तरी मनात जिद्द असेल तर कशावरही मात करता येते. अंध असलेल्या अवघ्या पंधरा वर्षाच्या मनस्वीनेही अशीच नेत्रदीपक कामगिरी करून दाखविली आहे. मनस्वीने अंधत्वावर मात करून आपल्या वडिलांसोबत हिमाचल प्रदेशमधील मनाली ते जम्मू-काश्मीरमधील खारदूंगपर्यंतचा पल्ला सायकलवरून गाठला आहे.
मनावर घेतले तर जगात कोणतीच गोष्ट अशक्य नाही, असेच मनस्वीने हा प्रवास पूर्ण करून दाखवून दिले आहे. तिच्या या धाडसाचे आणि कामगिरीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. भारतात पहिल्यांदाच अॅडव्हेंचर बियॉन्ड बॅरियर्स फाउंडेशन ने टॅडम सायकल स्पर्धा आयोजित केली होती. मनस्वी आणि तिच्या वडिलांनी या स्पर्धेत भाग घेतला होता. त्यांनी टॅडम सायकलवरून अवघ्या दोन आठवड्यात हा टप्पा गाठला.