जुलै महिन्यात आलेल्या महापुरात सांगलीत हजारो नागरिकांचे अतोनात नुकसान झाले. या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाकडून दहा हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येत आहे. मात्र महापूर येऊन तीन महिने उलटून गेले, तरी अद्यापही अनेक पूरग्रस्तांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम जमा झाली नाही. त्याचबरोबर काही पूरग्रस्तांच्या खात्यावर तुटपुंजी मदत जमा झाली आहे. पूरग्रस्तांच्यावर सरकारकडून हा अन्याय झाल्याचा आरोप करत दलित महासंघाच्या वतीने आज शुक्रवारी आघाडी सरकार विरोधात आंदोलन करण्यात आले आहे.
सांगली-इस्लामपूर बायपास रस्त्यावर पूरग्रस्तांना घेऊन चक्काजाम आंदोलन करण्यात आले. सुमारे अर्धा तास पूरग्रस्तांनी रस्त्यावर ठिय्या मारला होता. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती. मात्र पोलिसांनी आंदोलकांना हटवत वाहतुकीचा मार्ग खुला केला.
पूरग्रस्तांच्या या हक्काच्या मागणीसाठी करण्यात आलेल्या या आंदोलनाची आघाडी सरकारकडून दखल न घेतल्यास येत्या मंगळवारी पूरग्रस्तांना घेऊन कृष्णा नदीच्या पात्रामध्ये जलसमाधी घेऊ, असा इशारा गणित महासंघाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सतीश मोहिते यांनी दिला आहे.