Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ब्लड अल्कोहोल टेस्ट रिपोर्ट कोर्टात सबळ पुरावा ठरतो? वाचा

ब्लड अल्कोहोल टेस्ट रिपोर्ट कोर्टात सबळ पुरावा ठरतो? वाचा
, शुक्रवार, 31 मे 2024 (10:05 IST)
पुण्यातल्या पोर्शे अपघातातले धक्कादायक तपशील दररोज समोर येत आहेत.
हा अपघात कसा झाला? घटनेचं CCTV फुटेज? गाडी ड्रायव्हर चालवत होता की अल्पवयीन आरोपी? आणि त्यातच, त्या आरोपीच्या रक्ताच्या चाचणीतही घोळ केल्याचं आरोपांनंतर दोन डॉक्टरांवरही कारवाई झाली आहे.
 
पण कुठल्याही प्रकरणात, खासकरून अशा ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणात, रक्ताची चाचणी का इतकी महत्त्वाची ठरते? पुणे अपघात प्रकरणात हे पुरावे नष्ट झाल्यामुळे कोर्टात हा सबळ पुरावा मानला जाईल का? जाणून घेऊया.
 
19 मेच्या रात्री पुण्यातल्या कल्याणी नगर परिसरात एक अल्पवयीन मुलगा दारूच्या नशेत भरधाव वेगात गाडी चालवत होता. त्याने एका बाईकला धडक दिली, आणि त्यात दोन निष्पाप जीव गेले.
 
त्यानंतर अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले, तेव्हा त्याचे चाचणी अहवाल यायला इतका उशीर झाला की, त्याबद्दल संशय येऊ लागला.
 
नंतर कळलं की, पुण्याच्या ससून हॉस्पिटलमध्ये ही चाचणी झाली होती, तिथल्या डॉक्टरांनी त्या मुलाच्या रक्ताचं सँपल फेकून दिलं होतं, आणि दुसऱ्याच व्यक्तीच्या रक्ताची चाचणी करून, त्याचा रिपोर्ट देण्यात आला. यामुळे पुणे पोलिसांनी दोन डॉक्टरांना ताब्यातही घेतलंय.
 
असंच एक प्रकरण मुंबईच्या सायन हॉस्पिटलमध्येही घडलं, जिथे एका डॉक्टरने मद्यधुंद अवस्थेत एका वृद्ध महिलेला गाडीखाली चिरडल्याचा प्रकार घडलाय.
 
त्यातही त्या डॉक्टरच्या रक्ताचे नमुने उशिराने घेण्यात आल्याचे आरोप झाले, यामुळे तपासावर शंका घेतली जात आहे.
 
पण कुठल्याही प्रकरणात हे रक्ताचे नमुने का महत्त्वाचे असतात, हे जाणून घ्यायला, आधी पाहू या की ही चाचणी कशी केली जाते.
 
रक्तातल्या दारूच्या प्रमाणाची चाचणी कशी होते?
Alcohol Blood Test याला Blood Alcohol Content म्हणजे BAC टेस्ट ही एखाद्याच्या शरीरातील अल्कोहोल मोजण्याचा हा सर्वात अचूक मार्ग आहे.
 
त्याचा उपयोग कायदेशीर किंवा वैद्यकीय हेतूंसाठी केला जाऊ शकतो.
दारूच्या प्रत्येक प्रकारात इथेनॉल हे केमिकल कमी-जास्त प्रमाणात असतं. तुम्ही मद्यपान केल्यावर त्यातलं इथेनॉल रक्तात शोषून घेतलं जातं.
 
इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्र राज्यचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे सांगतात की, "एखाद्या व्यक्तीने दारू प्यायली की, पुढच्या 10 ते 15 मिनिटांत ती त्याच्या रक्तात उतरते.
 
अशा व्यक्तीच्या रक्तात अल्कोहोलचं प्रमाण 12 तासांपर्यंत राहातं, पण रक्ताच्या सँपलची चाचणी 6 तासांच्या आत करावी. त्यानंतर ही चाचणी केली तर संबंधित व्यक्तीच्या रक्तातील दारूचं प्रमाण कमी होतं.
 
“या चाचणीसाठी ब्लड सँपल घेताना हाताला स्पिरीट लावू नये, कारण त्यात आधीच अल्कोहोल असतं. तसंच चाचणीनंतर संबंधित सँपल किमान एक दिवस ठेवावं. त्यानंतरच ते नष्ट करावं, कारण पोलिसांकडून त्याच्या पुनर्चाचणीची मागणी होऊ शकते.
 
ही चाचणी सरकारी दवाखान्यात घेतली तरच ती कोर्टात सबळ पुरावा म्हणून ओळखला जातो. खासगी हॉस्पिटलमध्ये अशा चाचण्या करण्याची सोय असते. पण गुन्हा केलेल्या व्यक्तीच्या रक्ताची चाचणी सरकारी हॉस्पिटलमध्येच करणं अपेक्षित असतं.
 
रक्तातील दारूचं प्रमाण 0.03 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त असेल, म्हणजे 100 मिलीलीटर रक्तात 0.03 मिलीलीटर दारू असेल तर त्याचा परिणाम व्यक्तीच्या वागण्यावर होतो. कारण अल्कोहोलचा तुमच्या लहान मेंदूवर थेट परिणाम होतो.”
 
सुरुवातीला त्या व्यक्तीला रिलॅक्स वाटू शकतं. ते जास्त मनमोकळेपणाने बोलतात, सामान्यतः ज्या गोष्टी नाही करतील, त्या गोष्टी करतात.
 
पण शरीरातील दारूचं प्रमाण वाढलं की तुम्हाला मेंदूची विचार प्रक्रिया मंदावू शकते, कधीकधी धुसर दिसू लागतं, शरीराचा तोल जाऊ शकतो आणि एखाद्या गोष्टीला प्रतिक्रिया देणंही जमत नाही. तुमच्या Reflex actionमध्येही फरक पडतो.
 
त्यामुळेच दारू पिऊन वाहन चालवणं स्वत:साठी आणि इतरांसाठीही धोक्याचं ठरतं.
 
गाडीची दिशा, वेग, संतुलन या गोष्टींचं भान सुटतं. एखादी गाडी किंवा व्यक्ती अचानक समोर आली की काय करावं, हे मेंदू तातडीने सांगू शकत नाही. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता बळावते.
 
फक्त ड्रायव्हिंगच नव्हे तर पोहण्यासारख्या इतरही कृती जिवावर बेतू शकतात, असं डॉ. अविनाश भोंडवे सांगतात.
 
त्यामुळेच एखादा गुन्हा घडला की संशयित आरोपींच्या रक्ताची चाचणी करून त्यांना ती घटना घडली तेव्हा किती शुद्धी होती, याचं आकलन केलं जातं.
 
ब्लड टेस्ट रिपोर्ट कोर्टात सबळ पुरावा ठरतो का?
संशयित आरोपीचा Blood Alcohol Concentration म्हणजे BAC रिपोर्ट कोर्टात Indian Evidence Act च्या कलम 45 नुसार ग्राह्य धरला जातो. याला expert evidence अर्थात तज्ज्ञांचा पुरावा म्हटलं जातं.
 
फौजदारी कायदे विषयाचे अभ्यासक आणि अ‍ॅडव्होकेट शंतनू हरपळे सांगतात की, "दारू पिऊन कार चालवली तर अपघातात रस्त्यावरील व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो हे माहिती असूनही ती कृती करणं हे IPC कलम 304 अंतर्गत गुन्हा ठरतो. अपघात करणाऱ्या व्यक्तीचा BAC रिपोर्ट योग्य प्रकारे सरकारी दवाखान्यात चाचणी करून कोर्टात मांडला तर आरोपीला शिक्षा होऊ शकते.”
 
यामध्ये दोन पातळीवर गुन्हे दाखल होऊ शकतात. एक IPC कलमांतर्गत आणि दुसरं Motor Vehicle Act अंतर्गत
 
अशा Drink and drive प्रकरणांच्या सुनावणीदरम्यान संबंधित डॉक्टरांची कोर्टात साक्ष नोंदवली जाते. त्यांनी रक्ताची चाचणी कशी केली? ब्लड सँपल कसं गोळा केलं? चाचणी योग्य प्रकारे झाली होती का? या सर्व गोष्टींची उलटतपासणी होते.
 
अशा पुराव्यांच्या आधारे जर कुणी कुणाच्या मृत्यूला कारणीभूत आहे, असा गुन्हा सिद्ध झाला तर त्या आरोपीला किमान 10 वर्षांची शिक्षा होते.
 
पुणे अपघात प्रकरणात रक्ताच्या सँपलशी छेडछाड झाल्याचं निष्पन्न झालं असलं, तरीही पुणे पोलिसांनी म्हटलंय की त्यांच्याकडे तो मुलगा जिथे दारू पित होता, त्या हॉटेलचे CCTV फुटेज आणि इतरही पक्के पुरावे आहेत, ज्याच्या आधारे ते त्यांची बाजू मांडू शकतील.

Published By- Priya Dixit
 
 
 
 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

गूपॉर्न स्टारला पैसे दिल्याप्रकरणी डोनाल्ड ट्रम्प दोषी, आता ते अध्यक्षपदाची निवडणूक लढवू शकणार का?