राज्य शिक्षण मंडळाचा दहावीचा निकाल शुक्रवारी (16 जुलै) दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर होणार होता. परंतु बोर्डाची वेबसाईट क्रॅश झाल्याने विद्यार्थ्यांना तब्बल सात तास निकालाची वाट पहावी लागली.
विद्यार्थ्यांचा निकाल विक्रमी लागल्यानेच वेबसाईट क्रॅश झाली,असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.
यंदा परीक्षा न झाल्याने अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे विद्यार्थ्यांना गुण देण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांचा निकाल जास्त असल्याने त्यांच्यात उत्सुकता होती.याचा परिणाम म्हणून विद्यार्थ्यांनी एकाच वेळी वेबसाईटला भेट दिल्याने लोड येऊ शकतो,असंही ते म्हणाले.
यंदा दहावीचा निकाल 99.95 टक्के लागला.83,262 विद्यार्थ्यांना 90 टक्क्यांहून अधिक गुण मिळाले आहेत. तर 957 विद्यार्थ्यांना 100% गुण मिळाले आहेत. 9 विभागीय मंडळांपैकी कोकण विभागाचा सर्वाधिक 100 टक्के लागला आहे.