Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मेंढपाळ कुटुंबात जन्म ते ओबीसी आरक्षणासाठी आंदोलन, कोण आहेत लक्ष्मण हाके?

Lakshman Hake
, शनिवार, 22 जून 2024 (00:15 IST)
"प्रचाराला पैसेच नाही तर मला मतं कशी मिळणार. फुले, आंबेडकरांना तरी लोकांनी कुठं निवडून दिलं. पण त्यांनी समाजाला न्याय दिलाच. त्यामुळं मीही सामाजिक कार्याच्या मार्गावर निघालो."
सध्या राज्यभरात चर्चेचा विषय बनलेल्या आणि ओबीसी आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्या प्रा. लक्ष्मण हाके यांचे हे शब्द.
 
मनोज जरांगेंच्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ओबीसींच्या हक्काचं संरक्षण करण्यासाठी हाके यांनी जालन्याच्याच वडीगोद्री याठिकाणी उपोषण सुरू केलं आहे.
 
राज्यातील अनेक नेत्यांनी हाके यांची भेट घेतली असून सरकारच्या माध्यमातूनही हाके यांचे उपोषण सोडवण्यासाठी सध्या प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी सरकारच्या शिष्टमंडळांनी हाकेंची भेट घेऊन चर्चाही सुरू केली आहे.
ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात लेखी आश्वासन देण्याची मागणी लक्ष्मण हाके यांनी केली आहे.
 
त्यांचा राजकीय, सामाजिक क्षेत्रातील प्रवास नेमका होता कसा हे आपण जाणून घेणार आहोत.
 
हाकेवस्ती ते पुण्याचा प्रवास
लक्ष्मण हाके हे सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातल्या जुजारपूर या गावचे रहिवासी आहे. याठिकाणी असलेल्या हाके वस्तीमध्ये आजही त्यांचे आई-वडील आणि इतर नातेवाईक राहतात.
 
मेंढपाळ असलेल्या आणि ऊस तोडणीचं काम करणाऱ्या कुटुंबामध्ये लक्ष्मण हाके यांचा जन्म झाला.
जन्मानंतर काही काळ हाके यांचं बालपण आजोळी गेलं. त्यांच्या आजी-आजोबांनी त्यांना लहानपणी काही दिवस सांभाळल्याचं, त्यांच्या आईनं महाराष्ट्र टाईम्सशी बोलताना सांगितलं.
 
सुरुवातीचं त्यांचं शालेय शिक्षणही हाकेवस्तीमध्येच झालं. त्यांनी त्याठिकाणी 10 वी पर्यंत शिक्षण घेतलं. त्यानंतर एक वर्ष त्यांनी सांगलीत राहून शिक्षण घेतलं आणि नंतर पुढच्या शिक्षणासाठी ते पुण्याला गेले.
 
ऊस तोडणीही केली
हाके यांचे आई-वडील ऊस तोडणीचं काम करायचे. परिस्थिती तशी हलाखीचीच होती. पण तरीही मुलाचं शिक्षण त्यांनी थांबू दिलं नाही.
 
स्वतः लक्ष्मण हाके यांनीही ऊस तोडणीचं काम केलेलं होतं. त्यामुळं कामाची सवय असल्यानं पुण्यात शिक्षणासाठी गेल्यानंतर 'कमवा आणि शिका' या मार्गाचा अवलंब पूर्ण करत त्यांनी एम.ए. पूर्ण केलं.
त्यानंतर लक्ष्मण हाके हे लेक्चरर बनले. पुण्यात फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये हाके अध्यापनाचं काम करायचे. दरम्यानच्या काळात त्यांनी नामदेव ढसाळांवर प्रबंधही लिहिला.
 
पण, त्यानंतर त्यांनी स्वतःला पूर्णवेळ समाजकार्यामध्ये वाहून घेतलं. हाके यांची पत्नी प्राध्यापक आहे.
 
'सासऱ्यांनी बोलावली बैठक'
हाके यांनी नुकतीच टीव्ही 9 मराठी या वाहिनीशी बोलताना एक आठवण सांगितली होती.
 
लक्ष्मण हाके म्हणाले की, त्यांनी लग्नापूर्वीच पत्नीला सांगितलेलं होतं की, तू नोकरी कर कारण मला सामाजिक काम करायचं आहे.
 
त्यानुसार त्यांनी फर्ग्युसनमध्ये काही महिने शिकवल्यानंतर लेक्चरला जाणं बंद केलं आणि सामाजिक कार्याला त्यांनी सुरुवात केली होती. पण ही बाब त्यांच्या सासरच्या मंडळींना समजली होती.
जावई काहीच काम करत नाही, हे समजल्यानंतर त्यांचे सासरे काहीसे अस्वस्थ झाले होते. त्यांनी लग्न जुळवताना असलेले मध्यस्थ सोबत घेऊन याबाबतीत अक्षरशः बैठक बोलावली होती, असं हाके सांगतात.
 
त्यावेळी त्यांच्या प्रश्नांची उत्तरं माझ्याकडं नव्हती. मी एवढा अस्वस्थ होतो की, त्यांना समजावूनही सांगू शकत नव्हतो, असं लक्ष्मण हाके म्हणाले.
 
असा राहिला राजकीय प्रवास
लक्ष्मण हाके यांनी 2004 पासून सक्रियपणे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात काम करायला सुरुवात केली.
 
धनगर नेते महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाच्या (रासप) माध्यमातून हाके यांनी सामाजिक आणि राजकीय प्रवासाला सुरुवात केली. रासप पक्षाच्या वाढीसाठी हाके यांनी परिश्रम घेतले.
 
धनगर आरक्षणासाठीच्या आंदोलनात सक्रिय सहभाग घेत हाके यांनी त्यासाठी प्रयत्न केले. 2014 च्या निवडणुकीमध्ये त्यांनी आक्रमपणे गावोगाव फिरत पक्षाचा प्रचार केला.
 
2014 मध्ये सांगोला विधानसभा मतदारसंघात त्यांनी गणपतराव देशमुख यांना पाठिंबा जाहीर केला होता. पण 2019 च्या विधानसभा निवडणुकीत मात्र लक्ष्मण हाके यांनी सांगोला विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. पण त्यांना त्यात विजय मिळवता आला नाही.
मात्र, 2019 नंतर हाके यांनी महादेव जानकर यांची साथ सोडली. देवेंद्र फडणवीसांच्या धोरणाला कंटाळून महादेव जानकरांची साथ सोडल्याचं हाके यांनी म्हटलं.
 
शिवसेनेतील फुटीनंतर हाके यांनी उद्धव ठाकरे यांच्या गटात प्रवेश केला. शिवसेनेच्या माध्यमातून पुढचं राजकारण करण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता. त्यानंतर शहाजीबापू विरुद्ध हाके असा लढा रंगणार अशा चर्चा सुरू झाल्या होत्या.
 
राजकीय काम सुरू असतानाच सामाजिक लढ्यातही त्यांचे प्रयत्न सुरू होते. त्यातूनच काही काळासाठी त्यांनी मागासवर्गीय आयोगाचे सदस्य म्हणूनही काम केलं.
 
ओबीसींच्या समस्या आणि प्रश्न सोडवण्याच्या उद्देशानं त्यांनी ओबीसी संघर्ष सेनेची स्थापनादेखील केली. त्या माध्यमातून ते ओबीसी समाजाचं काम करतात.
 
माढ्यातून लढवली लोकसभा
शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यानंतर लोकसभा निवडणुकीमध्ये माढा लोकसभा मतदारसंघातून लढण्याची संधी मिळावी अशी लक्ष्मण हाके यांची इच्छा होती. त्यासाठी त्यांनी प्रयत्न केले होते.
 
पण महाविकास आघाडीत माढा लोकसभा मतदारसंघ शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाला. त्यामुळं हाके यांना शिवसेनेकडून उमेदवारी मिळाली नाही. अखेर त्यांनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला.
 
ओबीसी समाज पक्षाच्या माध्यमातून हाके यांनी लोकसभा निवडणूक लढवली. पण त्यांना यश मिळालं नाही. डिपॉझिट जप्त होण्याची नामुष्की या निवडणुकीत त्यांच्यावर ओढवली.
 
अपक्ष असलेल्या हाके यांना लोकसभा निवडणुकीत अवघी 5134 मते मिळाली.
 
कधी पोतराज, तर कधी फुल्यांच्या वेषात
लक्ष्मण हाके यांनी आजवर आक्रमकपणे ओबीसींचे प्रश्न मांडल्याचं दिसून आलं आहे.
 
काही वर्षांपूर्वी त्यांनी ओबीसी आणि भटक्या विमुक्तांच्या मागण्यांबाबत पुणे जिल्हाधिकारी कार्यलयासमोर आंदोलन केलं होतं. त्यावेळी ते पोतराजाचा वेष धारण करून जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले होते. त्याबाबत प्रचंड चर्चा झाल्याचं पाहायला मिळालं होतं.
त्यानंतर जरांगे पाटलांच्या आरक्षणाच्या आंदोलनानंतर ओबीसी नेत्यांनीही आक्रमक भूमिका घेत ओबीसी मेळावा घेतला होता. त्यावेळी हाके यांना मेळाव्यात येऊ नये अशी धमकी मिळाली होती. या धमकीनंतर लक्ष्मण हाके हे हलगीच्या तालावर वाजत गाजत मेळाव्यात पोहोचले होते.
 
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही त्यांनी उमेदवारी अर्ज भरला त्या स्टाईलची चर्चा झाली होती. माढ्यातून लोकसभेचा अर्ज भरण्यासाठी ते थेट महात्मा फुल्यांच्या वेषात पोहोचले होते.
 
लक्ष्मण हाके यांनी सरकारसमोर सध्या प्रामुख्यानं दोन मागण्या केलेल्या आहेत. त्यापैकी पहिली मागणी मराठा आरक्षण दिल्यास ओबीसी आरक्षणाला कसा धक्का लागणार नाही याचं लेखी आश्वासन द्यावं ही आहे. तसंच सगेसोयरेच्या मागणीला आणि सरसकट कुणबी प्रमाणपत्र वाटपाला त्यांचा विरोध आहे.
 
दुसरीकडे मनोज जरांगे यांनी मात्र हाकेंचं आंदोलन हे सरकार पुरस्कृत असल्याची टीका केली आहे.
 
आंदोलनात गैर काही नाही-वरकड
स्वतःच्या किंवा समाजाच्या हितासाठी आंदोलन करण्याचा हक्क सगळ्यांनाच असल्यानं लक्ष्मण हाकेंच्या आंदोलनाला चुकीचं म्हणता येणार नाही, असं मत वरिष्ठ पत्रकार संजय वरकड यांनी व्यक्त केलं आहे.
 
त्यांनी जरांगे आणि हाके यांच्या आंदोलनांची तुलनादेखील केली.
 
ते म्हणाले की, "जरांगे यांचं आंदोलन जवळपास 10-11 वर्षे सुरू होतं. ते त्यांचं मूलभूत आंदोलन होतं. पण आंतरवाली सराटीतील लाठीहल्ल्यामुळं त्याला राजकीय वळण लागलं. त्या राजकीय वळणाला प्रत्युत्तर म्हणून हाके यांचं आंदोलन आहे, आणि तेही स्वाभाविकच आहे," असं संजय वरकड म्हणाले.
 
पण, आता या सगळ्यानंतर सरकारला या सर्वाची उत्तरं द्यावी लागणार असल्याचं ते म्हणाले.
 
आरक्षणाबाबत बिहारच्या निर्णयानंतर 50 टक्क्यांबाहेर मराठ्यांचे आरक्षण कसे टिकणार हा एक प्रश्न आहे. तर मराठ्यांना 50 टक्क्यांच्या आत आरक्षण दिल्यास ओबीसींच्या आरक्षणाचं संरक्षण कसं होणार हा एक प्रश्न आहे. या दोन्ही प्रश्नांची उत्तरं सरकारला द्यावी लागतील, असं वरकड यांनी म्हटलं.
 
Published By- Priya Dixit 
 
 
 
 
 
 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

माझ्या डोळ्यांसमोर भावाचा तडफडून मृत्यू झाला', तामिळनाडूत विषारी दारुचे 47 बळी-ग्राउंड रिपोर्ट