नाशिक : बंद घरे हेरून घरफोड्यांचे सुरू असलेले सत्र दिवाळीनंतरही सुरूच आहे. कामटवाड्यात बंद बंगल्याच्या खिडकीचे गज कापून चोरट्यांनी तीन लाखांच्या रोकडसह ४४ तोळ्यांचे दागिने, असा सुमारे १४ लाखांचा ऐवज चोरून नेला. शिवाय पंचवटी व आडगावातही दिवसा घरफोडी झाली.
दिवाळी सुट्ट्यांमुळे अजूनही नागरिक गावांवरून परतलेले नाहीत. हीच संधी साधून चोरटे बंद घरे हेरून घरफोडी करीत आहेत. कामटवाडे-अंबड लिंक रोडवरील लक्ष्मीनगरमध्ये बंद बंगला चोरट्यांनी फोडून चोरी केली. राजेश जगन्नाथ गायकर (रा. श्री समर्थ कृपा बंगलो, लक्ष्मीनगर, सायखेडकर हॉस्पिटलमागे, कामटवाडा) कुटुंबियांसह शनिवारी (ता. २९) नांदगावला गेले होते. चोरट्यांनी बंद बंगल्याच्या खिडकीचे गज कापूत आत प्रवेश केला.
चोरट्यांनी बेडरूममधील लोखंडी कपाटातून तीन लाखांची रोकड व सोन्याचे दागिने, असा १३ लाख ९८ हजारांचा ऐवज चोरून नेला. यात ४४ तोळे सोन्याचेव ८ किलो चांदीचे दागिन्यांचा समावेश आहे. गायकर रविवारी परतल्यानंतर घरातील सामान अस्तव्यस्त पाहून घरफोडी झाल्याचे लक्षात आले. याबाबत अंबड पोलिसांत घरफोडीचा गुन्हा दाखल झाला असून, उपनिरीक्षक पावरा तपास करीत आहेत.
दुसऱ्या घटनेत हिरावाडीत बंद घराचे लॉक तोडून चोरट्यांनी ७५ हजारांचा ऐवज चोरून नेला. शनिवारी सकाळी अकराच्या सुमारास चोरट्यांनी विष्णू केदार (रा. उत्तम अपार्टमेंट, लाटेनगर, हिरावाडी, पंचवटी) यांच्या बंद घराचे लॉक तोडले. चोरट्यांनी घरात प्रवेश करून बेडरूममधील कपाटाचे लॉक तोडून ४० हजारांची रोकड व सोन्याचे दागिने, असा ७५ हजारांचा ऐवज चोरून नेला. याबाबत पंचवटी पोलिसांत घरफोडीचा गुन्हा दाखल झाला आहे.
तिसरी घरफोडीची घटना आडगाव शिवारातील वृंदावननगरमध्ये घडली. २१ ऑक्टोबरला दुपारी तीनच्या सुमारास चोरट्यांनी कुंदन ठाकरे (रा. प्रगती सोसायटी, वृंदावननग, आडगाव) यांच्या बंद रो हाऊसच्या मुख्य दरवाज्याची कडीकोयंडा तोडला. आत प्रवेश करून चोरीचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्या हाती काही लागले नाही. याबाबत आडगाव पोलिसांत घरफोडीचा गुन्हा दाखल झाला असून, उपनिरीक्षक अनिल पाटील तपास करीत आहेत.