लातूरच्या मुरुडमध्ये भीषण बस अपघात झाला आहे. या अपघातात ४० जण जखमी झाले असून त्यापैकी १४ गंभीर आहेत. जखमींना लातूरच्या शासकीय रुग्णालायत दाखल करण्यात आले आहे. या अपघातात कोणतीही जिवीतहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती आहे.
निलंगावरून पुण्याकडे जाणाऱ्या एसटी बसचा मुरूड जवळ स्टेरिंग रॉड तुटल्याने बस पुलावरून खाली कोसळली. यामध्ये पन्नास पेक्षा अधिक प्रवासी जखमी झाले. ही घटना आज घडली. जखमींवर मुरूड ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
निलंगा आगाराची बस (MH20 BL 2372) निलंग्याहून पुण्याकडे जात होती. सकाळी आठच्या सुमारास बोरगाव काळे ते मुरुड दरम्यान बसचा स्टेरिंग रॉड तुटला. त्यामुळे चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले व बस पुलाचा कठडा तोडून खाली कोसळली. घटनेनंतर बोरगाव काळे शिवारातील शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी प्रवाशांना बस बाहेर काढले. याबाबत मुरुड पोलिसांना माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. जखमींना मुरुड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर काही गंभीर जखमी झालेल्या प्रवाशांना लातूर येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.
Edited By - Ratnadeep Ranshoor