Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सरकारने जिल्हा बैंकेला अतिरिक्त निधी द्यावा : भुजबळ

सरकारने जिल्हा बैंकेला अतिरिक्त निधी द्यावा  : भुजबळ
, रविवार, 28 मे 2017 (20:55 IST)
शेतकऱ्यांना पीककर्ज पुरवठा करणारी आणि शेतकऱ्यांची अर्थवाहिनी असलेली नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँक प्रचंड आर्थिक अडचणीत सापडली आहे. कर्जमाफीच्या आशेमुळे जिल्हा बँकेची वसुली ठप्प झाली असल्यामुळे याचा परिणाम पिक कर्जवाटपावर झाला आहे.नाशिक जिल्ह्यातील शेतकरी वर्ग प्रचंड अडचणीत सापडला असून त्यामुळे जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण देखील  वाढले आहे. त्यामुळे त्यांना तात्काळ पिककर्ज पुरवठा करण्यासाठी निधी द्यावा अशी मागणी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आ.छगन भुजबळ यांनी राज्याचे सहकार व पणन मंत्री सुभाष देशमुख यांचेकडे पत्राद्वारे केली आहे.
 
छगन भुजबळ यांनी पत्रात म्हटले आहे की, शेतकऱ्यांना पीककर्ज पुरवठा करणारी आणि शेतकऱ्यांची अर्थवाहिनी असलेली नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँक प्रचंड आर्थिक अडचणीत सापडली आहे. कर्जमाफीच्या आशेमुळे जिल्हा बँकेची वसुली ठप्प झाली आहे. यांचा परिणाम पिककर्जवाटपावर झाला आहे. शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची तयारी सुरु केली आहे. मात्र,जिल्हा बँकेच्या अडचणींमुळे पीककर्ज मिळण्याची शक्यता धूसर झालेली असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
 
शेतकऱ्यांना खरीप असो की रब्बी, हंगामासाठी जिल्हा बँक पिककर्ज पुरवठा करत असते. मात्र, नाशिक जिल्हा बँकेची वसुली रखडल्याने तसेच बँकेच्या जुन्या नोटा बदलून न मिळाल्याने जिल्हा बँक अडचणीत सापडली आहे. बँकेचे व्यवहार देखील ठप्प झालेले आहेत. पुरेसा चलनसाठा नसल्याने बँकेच्या रोखीच्या व्यवहारांवर बंधने आली आहे. शेतकऱ्यांना जिल्हा बँकेकडून आगामी खरीप हंगामासाठी कर्ज पुरवठा उपलब्ध होऊ शकणार नाही. कर्ज मिळावे यासाठी शेतकरी रस्त्यावर उतरत आहेत. नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वाचविण्यासाठी शासनाने जिल्हा बँकेला पिक कर्जासाठी निधी उपलब्ध करून देण्याची नितांत आवश्यकता आहे.
 
शासनाने जिल्हा बँकेला निधी उपलब्ध करून दिला तरच आगामी खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना पिककर्ज उपलब्ध होणार आहे. पिककर्ज न मिळाल्यास खरीप हंगाम धोक्यात सापडण्याची चिन्हे आहेत. नाशिक जिल्ह्यातील शेतकरी प्रचंड संकटात सापडले असून, शेतकरी आत्महत्येचे सत्र दिवसेंदिवस वाढत आहे. दि. १ जानेवारी २०१७ ते २० मे २०१७ दरम्यान जिल्ह्यात ३७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. शेतकऱ्यांना वाचविण्यासाठी पिककर्ज मिळणे गरजेचे आहे. तरी, शासनाने नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिक कर्जासाठी जिल्हा बँकेला अतिरिक्त निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी छगन भुजबळ यांनी शेवटी केली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

लोणावळा : वॅक्स म्युझियममध्ये गडकरींचा पुतळा