Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

चंद्रपूर :सोमनाथ ताडोबा सफारी गेटमुळे खुले झाले रोजगाराचे दालन- सुधीर मुनगंटीवार यांचे प्रतिपादन

चंद्रपूर :सोमनाथ ताडोबा सफारी गेटमुळे खुले झाले रोजगाराचे दालन- सुधीर मुनगंटीवार यांचे प्रतिपादन
, सोमवार, 24 जुलै 2023 (08:01 IST)
जंगल सफारीसह व्याघ्र पर्यटनाचा आनंद
चंद्रपूर, दि. २२ - ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील सोमनाथ सफारी गेटच्या माध्यमातून पर्यटकांना जंगल भ्रमंतीसह व्याघ्र पर्यटनाचा आनंद लुटता येणार आहे. विशेष म्हणजे या नव्या गेटच्या निमित्ताने तरुणांसाठी रोजगाराचे एक नवे दालन खुले झाले आहे, असे प्रतिपादन राज्याचे वनमंत्री तथा जिल्हाचे पालकमंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी रविवारी केले. मुल तालुक्यातील सोमनाथ देवस्थान येथे सोमनाथ सफारी पर्यटन गेटचे त्यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते.
 
पालकमंत्री श्री.सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून सोमनाथ ताडोबा सफारी गेटचा शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमाला ,भाजपा जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा,जिल्हाधिकारी विनय गौडा,भाजप महानगरचे अध्यक्ष राहुल पावडे,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे,ताडोबाचे क्षेत्र संचालक डॉ. जितेंद्र रामगांवकर,मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन,उपसंचालक (बफर) कुशाग्र पाठक,माजी जी.प.अध्यक्षा संध्याताई गुरुनुले,भाजपा महिला मोर्चा प्रदेश महामंत्री अल्का आत्राम, आदींची उपस्थिती होती.
 
 वनमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, ‘सोमनाथ गेट पर्यटकांसाठी खुले करण्याची मागणी स्थानिकांनी केली होती. गावातील नागरिकांच्या शिष्टमंडळाने ताडोबा सफारीसाठी गेट निर्माण करावा, अशी सूचना केली होती. या मागणीचा सन्मान करत वन विभागाला सूचना केल्या व पर्यटकांच्या आनंदासाठी तसेच तरुणांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी गेट सुरू करण्यात आला आहे.’ सोमनाथ सफारी गेट पर्यटकांसाठी खुले होत असल्याचा मनस्वी आनंद होत असल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली. पावसामुळे ताडोबा येथील कोअरमध्ये प्रवेश बंदी असते. मात्र, बफरमध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात. महाराष्ट्रात असे अनेक जिल्हे आहेत जिथे वनराई दिसून येत नाही. मात्र, चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिक वनांच्या बाबतीत भाग्यशाली आहे.चंद्रपूर जिल्ह्यात २५ लक्ष वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट आहे. वंदे मातरम १९२६ यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. यामध्ये अवैध वृक्षतोड, अवैध शिकार तसेच कामचुकार अधिकाऱ्यांच्या बाबतीत तक्रार दाखल करता येणार आहे. असेही ना. मुनगंटीवार म्हणाले
 
जंगलालगतच्या गावांना कुंपण
वन्य प्राण्यांमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते, ही चिंतेची बाब आहे. विधीमंडळ अधिवेशनात एक कायदा येणार असून या कायद्यानुसार वन्यप्राण्यांनी शेतीचे नुकसान केल्यास तीस दिवसाच्या आत नुकसान भरपाई द्यावीच लागणार आहे. गरीब शेतकरी स्वतःच्या पैशातून कुंपण लावू शकत नाही, त्यामुळे जंगलालगत असणाऱ्या गावांच्या बाजूला दोन किलोमीटरवर कुंपण टाकून वन्यप्राण्यांना गावात येण्यापासून  रोखण्याचे नियोजन करता येईल का, यासंदर्भातील प्रस्ताव कॅबिनेटमध्ये ठेवला जाणार आहे, अशी माहिती ना. मुनगंटीवार यांनी दिली. सोलर व तारेच्या कुंपणाचाही पर्याय उपलब्ध करून देत कुंपण खरेदीसाठी शेतकऱ्याच्या खात्यात डीबीटीद्वारे थेट रक्कम देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
 
मृताच्या कुटुंबियांना आता २५ लाख
वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यास २० लक्ष रुपयाची मदत दिली जात होती. या रकमेत वाढ करून २५ लक्ष रुपये देण्याचा निर्णय करण्यात येत आहे, अशी घोषणा ना. मुनगंटीवार यांनी केली. वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तीला सरकारी रुग्णालयात उपचारासाठी गेल्यास पाच लक्ष रुपयांची मदत तर खाजगी रुग्णालयात उपचार घेत असल्यास १ लक्ष २५ हजार रुपयांची मदत दिली जायची. आता वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात जखमी व्यक्तीस कोणत्याही खाजगी दवाखान्यात उपचारासाठी पाच लाखापर्यंतची मदत देण्यात येत आहे, असेही ते म्हणाले.  जंगलात गेल्यामुळेच ९० टक्के मृत्यू वाघाच्या हल्ल्यात होतात. त्यामुळे अकारण जंगलात फिरू नका आणि अवैध वृक्षतोडही करू नका, असे आवाहन ना. मुनगंटीवार यांनी नागरिकांना केले.

Edited By- Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Russia-Ukraine: रशियन क्षेपणास्त्रांनी ओडेसामधील 25 प्रसिद्ध स्मारकांचे नुकसान केले युक्रेनियन अधिकार्‍यांचा आरोप