Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Wednesday, 2 April 2025
webdunia

साई मंदिराची आरती आणि दर्शनाच्या वेळात बदल, जाणून घ्या कसे असणार नवे वेळापत्रक…….

Changes in the timing of Aarti and Darshan of Sai Mandir
, बुधवार, 23 फेब्रुवारी 2022 (08:50 IST)
शिर्डी संस्थानने साईबाबा मंदिराची आरती आणि दर्शनाच्या वेळात बदल केला आहे. संस्थानच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. नवे वेळापत्रक महाशिवरात्रीपासून म्हणजेच एक मार्चपासून लागू करण्यात येणार आहे.
 
एक मार्चपासून आरतीच्या वेळा पूर्ववत होणार असून, काकड आरती पहाटे सव्वापाच वाजता तर शेजारती रात्री दहा वाजता करण्याचा निर्णय संस्थानने घेतला असून, तसेच दर्शनासह साईमंदिरांतील अन्य विधींचे वेळापत्रकही बदलणार असल्याची माहिती संस्थानच्या मुख्य कार्यकारी आधिकारी भाग्यश्री बानायत यांनी दिली आहे.
 
बानायत यांनी दिलेली माहिती अशी की, साईभक्‍त व ग्रामस्‍थांकडून काकड आरती व शेजारतीच्‍या वेळेत पूर्वीप्रमाणे बदल करण्‍यात यावा, अशी मागणी वारंवार करण्‍यात येत होती. त्‍यानुसार संस्‍थानचे अध्‍यक्ष आशुतोष काळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत काकड आरती व शेजारतीच्‍या वेळेत बदल करण्‍याचा निर्णय घेण्यात आला.
 
काकड आरती व शेजारती या आरत्‍यांच्‍या वेळेत बदल होत असल्‍यामुळे मंदिरातील दैनंदिन कार्यक्रमांच्‍या वेळेतही बदल करण्‍यात आला आहे. सर्व भाविकांनी या बदलाची नोंद घेऊन आपल्या दर्शनाचे नियोजन करावे. तसेच संस्थानला सहकार्य करावे,’ असे आवाहन बानायत यांनी केले आहे.
 
साईबाबांच्‍या समाधी मंदिरात प्रथेप्रमाणे विविध पुजा-अर्चा नियमित केल्‍या जातात. २००८ मध्ये गुढीपाडव्‍यापासून साईबाबांच्‍या समाधी मं‍दिरातील श्रींची काकड आरतीच्‍या वेळेत बदल करुन पहाटे साडेचार व रात्री साडे दहा अशी वेळ करण्यात आली होती. परंतु आता पूर्वीप्रमाणे वेळेत बदल केला आहे.
 
असे असेल वेळापत्रक –
– पहाटे ४.४५ वाजता समाधी मंदिर उघणार
– पहाटे ५.०० वाजता भुपाळी रेकॉर्ड सुरू होईल.
– पहाटे ५.१५ वाजता काकड आरती
– सकाळी ५.५० वाजता श्रींचे मंगलस्‍नान व त्‍यानंतर शिर्डी माझे पंढरपूर ही आरती
– सकाळी ६.२५ वाजता दर्शनास प्रारंभ
– दुपारी १२.०० वाजता श्रींची माध्‍यान्‍ह आरती
– सूर्यास्‍ताचे वेळी श्रींची धुपारती
– रात्री १०.०० वाजता श्रींची शेजारती
– रात्री १०.४५ वाजता समाधी मंदिर बंद.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मिळालेली घरे विकू नका – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पत्राचाळवासियांना भावनिक साद