Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांची १६ वर्षात २० वेळा पुन्हा बदली

tukaram mundhe
बुधवार, 30 नोव्हेंबर 2022 (08:21 IST)
राज्यातील शिस्तप्रिय आणि कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळख असलेले सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली करण्यात आली आहे. मात्र अद्याप त्यांना नवीन पोस्टिंग देण्यात आलेली नाही. कुटुंब कल्याण विभागाच्या संचालकपदावरून मुंढेंची बदली करण्यात आली आहे. कोणत्या विभागात बदली झाली याबाबत अजुनही स्पष्टता नाही. त्यामुळे अधिकारी वर्गामध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.
 
तुकाराम मुंढे हे नाव संपूर्ण महाराष्ट्रात परिचयाचे आहे. आपल्या शिस्तबद्द स्वभाव आणि कडक शिस्तीमुळे तुकाराम मुंढे नेहमीच चर्चेत असतात. सोबतच स्थानिक प्रशासनासोबत त्यांचे होणारे वाद-मतभेद तसेच वारंवार होणारी बदली यामुळे त्याचे नाव प्रसारमाध्यमांमध्येही नेहमी असते. आयएएस अधिकारी म्हणून ओळखले जाणारे तुकाराम मुंढे यांनी इथपर्यंत पोहोचण्यासाठी फार कष्ट घेतले आहेत. तुकाराम मुंढे यांच्या बदलीचा विक्रम झाला आहे. आतापर्यंत गेल्या १६ वर्षात तुकाराम मुंढेंच्या तब्बल २० पेक्षा जास्त वेळा बदली झाली आहे. दोन महिन्यापूर्वीच तुकाराम मुंढे यांची बदली झाली होती. सप्टेंबर २०२२ मध्ये तुकाराम मुंढे यांची आरोग्य विभागात बदली करण्यात होती. या दोन महिन्यात आरोग्य विभागात शिस्त आणण्याचा मुंढेंचा प्रयत्न होता. मुंढे यांच्याकडे राष्ट्रीय आरोग्य अभियानाची जबाबदारी होती. दोन महिन्याच्या आत मुंढे यांचा कार्यभार काढला. अद्याप नव्या जागेवर पोस्टींग नाही.
 
काही अधिकारी असे आहेत की, ते नेहमी जनतेच्या सोयी सुविधांसाठी विकास कामासाठी दक्ष असतात. त्यामध्ये तुकाराम मुंडे यांचा समावेश होतो, असे म्हटले जाते. परंतु ते नेहमीच वादग्रस्त ठरले आहेत. त्यांच्या अनेक वेळा अनेक ठिकाणी बदल्या झाल्या आहेत. असे शिस्तप्रिय अधिकारी तुकाराम मुंढे हे मागील महिन्यात ऐन दिवाळी काळात मराठवाड्यातील परभणी, औरंगाबाद, बीड जालना, लातूर, हिंगोली, लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये भेटी दिल्याने कामचुकार अधिकारी कर्मचारी यांच्या झोपा उडाल्या होत्या.
 
राज्यातील विविध जिल्ह्यात आपल्या धडाकेबाज कामांसाठी प्रसिध्द असलेले तुकाराम मुंढे हे सन २००५ मधील आयएएस बॅचचे अधिकारी आहेत. आतापर्यंत ज्या-ज्या ठिकाणी त्यांची पोस्टिंग झाली आहे. त्या ठिकाणी त्यांनी आपल्या धडाकेबाज कामाची ओळख निर्माण केली आहे. मुंढे यांच्या कामाबद्दल नागरिकांत नेहमीच समाधान व्यक्त करण्यात येते. मात्र सत्ताधारी आणि राजकारण्यांसाठी त्यांचे काम हे अडचणीचे ठरत असल्याचे दिसून येते. काही वेळा सत्ताधारी आणि विरोधकही तुकाराम मुंढेच्या विरोधात एकत्र येतात, त्यामुळे तुकाराम मुंढेंची बदली होते. परंतु नव्या ठिकाणी रुजू झालेले तुकाराम मुंढेंनी आपल्या धडाकेबाज कार्यशैलीमध्ये कोणताही बदल केलेला नाही, सध्या आरोग्य विभागात कार्यरत असलेल्या मुंडे यांनी येथे देखील आपली अशीच कार्यशैली दाखवली, आता त्यांची नेमकी कोणत्या विभागात आणि कोठे बदली होते, याबद्दल सर्वांना उत्सुकता आहे.

Edited By- Ratnadeep Ranshoor
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मंत्रिमंडळ बैठकीनंतर राज्यातील सहा सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या