महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९२७ मध्ये महाडमध्ये सामाजिक क्रांती केली. या सत्याग्रहाची दखल जगभरात घेतली गेली. तेव्हापासून लाखो अनुयायी चवदार तळे येथे येऊन महामानवाला अभिवादन करतात. या वर्षी पहिल्यांदा महाड येथे सरकारी मानवंदना देण्यात येणार आहे. तसेच या परिसरात हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यात येईल, असे आदेश रायगड जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी दिले आहेत.
महाड चवदार तळे सत्याग्रह, क्रांतिस्तंभ येथे १९ आणि २० मार्च या ऐतिहासिक दिवशी लाखो भीमसैनिक बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येत असतात. महाड येथील क्रांतिस्तंभाला सरकारी मानवंदना द्यावी, परिसरात हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यात यावी, अशी मागणी कोकण रिपब्लिकन सामाजिक संस्थेसह इतर संघटनांनी केली होती. रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी हा प्रस्ताव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रालयाकडे मंजुरीसाठी पाठवला होता. राज्य सरकारने त्यास तत्काळ मंजुरी दिली, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. म्हसे यांनी दिली. तयारीबाबत जिल्हाधिकारी डॉ. म्हसे यांनी नुकतीच आढावा बैठक घेतली.
Edited by : Ratnadeep Ranshoor