Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पार्ले ही मुंबईची सांस्कृतिक राजधानी -उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

devendra fadnavis
, गुरूवार, 23 मार्च 2023 (08:32 IST)
मुंबई लोकमान्य सेवा संघांने आपली मराठमोळी संस्कृती, संस्कार, धर्म यांची जपणूक केली आहे. संस्कृती, संस्कार विसरता कामा नयेत, याठिकाणी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी होत असून त्यांची जपणूकही होत असल्याने पार्ले ही मुंबईची सांस्कृतिक राजधानी असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले.
 
लोकमान्य सेवा संघ, पार्ले शताब्दी सांगता व पार्ले येथील गुढीपाडव्याची हिंदू नववर्ष स्वागत स्फूर्तीयात्रा कार्यक्रमात उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. यावेळी पर्यटनमंत्री तथा मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, खासदार पूनम महाजन, आमदार आशिष शेलार, आमदार पराग आळवणी, माजी मंत्री विनोद तावडे, डॉ. दीपक सावंत, लोकमान्य सेवा संघाचे अध्यक्ष मुकुंद चितळे, डॉ. रश्मी फडणवीस यांच्यासह पार्लेकर उपस्थित होते.
 
उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी नूतन मराठी वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा देत म्हणाले की, लोकमान्य सेवा संघाने १०० वर्षे अविरतपणे शिक्षण, आरोग्य, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रात कार्य केले. लोकमान्यांच्या नावाने बाणेदारपणे संघ चालतोय हे कौतुकास्पद आहे. संघाने पुढच्या १०० वर्षांची तयारी करावी.
 
प्रत्येकांनी इतिहासाच्या संस्कृतीचा अभिमान बाळगून  वाईटाचा त्याग करायला हवा. स्फूर्तीयात्रा, शोभायात्रा यातून समाजाचे प्रबोधन करण्याचा प्रयत्न होतो. आपण मराठी नववर्ष आनंदाने साजरे करतो, ३१ डिसेंबर पण साजरे करा, मात्र संस्कृती जपून करण्याचे आवाहन त्यांनी केले.
 
पार्ले येथे अत्याधुनिक कलादालन
 
पार्ले येथे अत्याधुनिक कलादालन करण्याचा प्रयत्न करू. तसेच विविध संस्थांना धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या परवानग्या मिळण्यात अडचणी येत आहेत. यासाठी कायद्यात बदल करून सर्व परवानग्या ऑनलाईन करू, असेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.
 
यावेळी श्री. फडणवीस यांच्या हस्ते मल्लखांब, जिमनॅस्टिकमध्ये विजेत्या खेळाडूंचा सन्मान करण्यात आला. शिवाय लोकसेवा सेवा संघाच्या स्मरणिकेचे प्रकाशन यावेळी मान्यवरांच्या  यांच्या हस्ते झाले.
 
उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी शोभायात्रा व  सहभागी कलाकार, ढोल-ताशांवर फुलांचा वर्षाव केला. अध्यक्ष मुकुंद चितळे यांनी प्रास्ताविक केले.
Edited by : Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आज बाळासाहेब असते तर...